पुणे शहरात छोट्या-मोठ्या टपर्यांसह सर्वत्र गुटखा विक्रेते आणि वाहतूक करणार्यांचे रॅकेट कार्यरत असून सोमवारी (दि.३०) एकाच दिवशी गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी रास्ता पेठ आणि बिबवेवाडी भागात दोन वेगवेगळ्या कारवाया करून 16 लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त केला. तर, तिघांना अटक केली.
गुटख्याचा साठा करून छुप्या पद्धतीने त्याची विक्री करणार्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथक दोनने रास्ता पेठ परिसरातून अटक केली. मुदसर इलियास बागवान (40, रा. भाग्योदयनगर, कोंढवा), अन्वर शरफुदिदन शेख (38, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 10 लाख 84 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर समर्थ पोलीस ठाण्यात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ उत्पादने, अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात अवैधरित्या गुटखा वाहतूक, विक्री करण्यास बंदी आहे. मात्र, तरीही अनेक भागात छुप्या पध्दतीने विक्री सुरूच आहे. रास्ता पेठेतील श्रीराम अपार्टमेंट येथे दोघांनी गुटखा, पानमसाल्याचा साठा करून ठेवल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 10 लाख 84 हजार 716यांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
तर, बिबवेवाडीतील सुखसागर नगर येथे तीनचाकी टेम्पोमधून गुटखा वाहतूक करणार्याला अंमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केली. अक्षय तुकाराम सुरवसे (30रा. बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून 4लाख 79जारांचा गुटखा जप्त करण्यात आला असून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्यासह पथक गस्तीवर असताना मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला पकडण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने शहरात विकण्यासाठी गुटखा आणल्याचे समोर आले आहे.
गुटखा, गांजा अन् दारू
काही दिवसांपुर्वीच शहराच्या मध्यवर्ती खडक भागातून पोलिसांनी गुटखा पकडला होता. त्यानंतर नूकतेच विमानतळ भागातून गांजा तस्कराला अटक करण्यात आली. तर, लोणीकंद, कोंढवा, लोणी काळभोर भागात गावठी दारू वाहतूकीचा पर्दाफाश करण्यात आला. त्यामुळे शहरालगतच्या भागासह मध्यवर्ती भागात हे रॅकेट सक्रिय असल्याचे दिसत आहे.