पोलिसांच्या धाडीत ५ लाख ५० हजाराचा गुटखा जप्त

सामना प्रतिनिधी । नळदुर्ग

गणेशोत्सव व मोहर्रम सणाच्या पार्श्वभुमीवर नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी अवैध धंद्यावर धाडी टाकण्यास प्रारंभ केला आहे. आज तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा नळ येथील एका घरावर धाड टाकून तब्बल ५ लाख ५० हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने गुटख्यावर बंदी घातली आहे. मात्र आजही सर्वत्र गुटखा राजरोसपणे विकला जात आहे. त्यामुळे गुटखाबंदी कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे.

नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी सध्या अवैध धंद्यावर धाडी घालून अवैध धंदे चालविणाऱ्याचे कंबरडे मोडले आहे. बुधवार १२ संप्टेबर रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस उपनिरीक्षक वाडे, सातपुते, पोलीस कर्मचारी हाजगुडे, कोष्टी यांनी तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा नळ येथील एका घरावर धाड टाकून गोवा तसेच सिकंदर कंपनीचा तब्बल ५ लाख ५० हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. देवसिंगा सारख्या एका लहान गावातून एवढा मोठ्या प्रमाणात मिळालेल्या गुटख्यावरुन ग्रामीण भागातही किती मोठ्या प्रमाणात गुटखा विकला जात असेल हे दिसून येत आहे.