व्यायामाचे हवेहवेसे व्यसन!

108

>> वरद चव्हाण

स्नेहलता तावडे अर्थात स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील राजमाता सोयराबाईसाहेब. स्नेहलताने या भूमिकेसाठी अभिनयासोबत स्वतःच्या शरीरयष्टीवरही विशेष मेहनत घेतली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे दैवतच. महाराजांची किंवा त्यांच्या संबंधित कुठलीही भूमिका प्रेक्षकांना पटेल अशी निभावणे हे कुठल्याही कलाकारासाठी खूप मोठं आव्हान असतं. कारण ती भूमिका जर तुम्ही नीट सादर केली नाहीत आणि प्रेक्षकांना ती रुचली नाही तर एक कलाकार म्हणून तुमचे करीयर संपल्यातच जमा होते आणि त्यात जर ती भूमिका छत्रपतींच्या पत्नींची ज्यांना जिजाऊंच्या मृत्यूनंतर थोरल्या माँसाहेबांचा दर्जा मिळाला, अशी असेल तर ती भूमिका तुम्ही कशी सादर करता यावर खूप काही अवलंबून आहे. राजमाता सोयराबाईसाहेब, आज सोयराबाईसाहेब असे तुम्ही गुगल केलं तर विकिपिडीयाच्या आधी जे नाव आणि इमेज येते ती आपली आजची सेलिब्रिटी कलाकार स्नेहलता तावडे-वसईकर.

मी त्यांना पहिल्यांदा टी.व्ही.वर पाहिलं ते ‘प्रीती परी तुजवरी’ या मालिकेत. तेव्हा त्या अतिशय फिट आणि सुंदर दिसत होत्या. अर्थात आजही त्या सुंदर आहेतच, त्यांच्याशी बोलण्याचा योग आल्या आल्या मी एका क्षणाचासुद्धा विचार न करता तुम्हाला आधीपासूनच व्यायामाची आवड होती का? तुम्ही तेव्हा इतक्या सडपातळ कशा होतात, हे विचारलं. त्यांच्याशी बोलता बोलता लक्षात आलं की, जरी तेव्हा त्यांना व्यायामाची आवड नसली तरी त्या लहानपणापासूनच विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असत. त्यामुळे त्यांचं शरीर सुदृढ होते, पण त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर त्यांचं वजन 87 किलो झालं होतं आणि त्यांचं कास्टिंग चंद्रकांत चिपळूणकर सिढी बंबावाला या मालिकेत झालं. तेव्हा त्या त्यांच्याच वयाच्या मुलीच्या आईची भूमिका करत होत्या आणि याच गोष्टीचा धसका घेऊन त्यांनी व्यायामाला सुरुवात केली.

व्यस्त शूट सुरू असताना त्यांना अनेक वेळा थकवा, आळस, झोप, पित्त या गोष्टींचा त्रास व्हायचा, पण व्यायाम सुरू केल्यापासून त्यांना अत्यंत फ्रेश वाटू लागलं. काम करताना अतिशय सकारात्मक वाटू लागलं आणि त्या व्यायाम मन लावून करू लागल्या. सुरुवातीला फक्त एक महिना आपण व्यायामशाळेत जाऊन बघू असं म्हणणाऱया स्नेहलता यांनी व्यायामशाळेची लाईफ टाइम मेंबरशिप घेतली आणि एका वर्षात नियमित व्यायाम करून त्यांच वजन 87 वरून 52 किलोवर आणल. आहे की नाही डेडिकेशन व मेहनतीचं उत्तम उदाहरण! व्यायामाबरोबरच त्यांना नृत्याचीसुद्धा खूप आवड आहे. नृत्यसुद्धा हा एक प्रकारचा व्यायाम आहे. त्यांचा आहार त्यांनी स्वतःच ठरवलाय. मुळात त्यांची चण अशी आहे की त्यांनी खूप खाल्लं तर लगेच ते त्यांच्या शरीरावर दिसतं आणि जरा जरी जेवण त्यांनी कंट्रोल केल तर त्यांच वजन जरा कंट्रोलमध्ये राहते. त्या पक्क्या मांसाहारी असल्यामुळे मासे, चिकन, मटण असा प्रथिनेयुक्त आहार आहे त्यांचा. भात त्या शक्यतो टाळतात. चहा, कॉफी, शीतपेय या सगळय़ा गोष्टींपासून त्या लांब राहतात. जंक फूड किंवा फास्ट फूड या गोष्टींमुळे तुमच वजन प्रमाणाबाहेर वाढतं. पण यांच्या घरीच हॉटेलिंग (हॉटेलचं जेवण) मागवलं जात नाही. घरातल्या सगळय़ांनी बाहेर जायचं म्हटलं तरी ते थाळीच खाणं पसंत करतात. त्या ‘बॉडी क्राफ्ट’ नावाच्या व्यायामशाळेत जात असून नीलेश मोरे हे त्यांचे प्रशिक्षक आहेत.

लोअर बॉडी वर्कआऊट म्हणजेच मांडय़ा, पोटऱयांचा व्यायाम त्यांना खूप आवडतो. तुमच्या लोअर बॉडीवर तुमचं बॉडी पोश्चर अवलंबून असतं असं त्यांचं ठाम मत आहे. पण व्यायामशाळेत जेव्हा कार्डिओ म्हणजेच ट्रेडमिल वर चालणं, सायकलिंग, स्टेप्स क्लाइम्ब्स् यासारख्या व्यायामाचा त्यांना अत्यंत कंटाळा येतो. यापेक्षा त्यांना त्यांच्या कॉलनीत दहा राऊंडस मारायला किंवा एखाद्या मैत्रिणी किंवा मित्राबरोबर सायकलिंग करायला जास्त आवडते. थोडक्यात काय तर त्यांना एकटं शांतपणे व्यायाम करायला आवडत नाही असं दिसतंय. या व्यतिरिक्त कलाकारांना ऍब्स वर्कआऊट करणं गरजेचे आहे असं त्यांच ठाम मत आहे. आज ‘सोयराबाई’ या भूमिकेमुळे स्नेहलता महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोचल्या आहेत. ही भूमिका कुठल्याही कलाकारासाठी मानसिक व शारीरिकदृष्टय़ा अवघडच आहे.

सोयराबाईंची त्यांचा पुत्र ‘राजाराम राजेंसाठीची’असणारी तळमळ संभाजीराजेंविरुद्ध रचलेले कारस्थान हे जितक्या सहजतेने त्यांनी आपल्या समोर सादर केले. पण मी म्हटल्याप्रमाणे ही भूमिका शारीरिकदृष्टय़ा पण अवघड होतीच आणि त्यामागचं कारण म्हणजेच त्यांना राजाराम राजेंच्या जन्माआधी बारीक राहायचे होते. मग एक मधला काळा ज्यात शंभूराजे मोठे होतात त्या दरम्यान त्यांना थोडं जाड व्हायचे होते आणि त्यांची भूमिका संपेपर्यंत त्यांना त्यांचं वजन थोडे जाडेपणाकडे झुकतंच हवं होतं. एका कलाकाराला कुठल्याही भूमिकेसाठी वजन वाढवणे आणि ती भूमिका संपल्यावर वजन परत कमी करणे ही प्रक्रिया खूप आव्हानात्मक असते. कारण भूमिका संपल्यावर वजन कमी व्हायला किती वेळ लागेल याचा अंदाज कोणालाच नसतो आणि वाढलेल्या वजनामुळे एखादी भूमिका हातातून जाऊ शकते, पण स्नेहलताचा असा विश्वास आहे की माझ्या अभिनयातून मला नवीन कामं मिळतात. त्या क्षणाला माझं वजन किती आहे त्यावर नाही आणि म्हणूनच ‘सोयराबाई’ या भूमिकेसाठी कुठलाही विचार न करता त्यांनी त्या भूमिकेसाठी स्वतःचं वजन वाढवलं तेव्हादेखील त्यांनी कुठलही जंकफूड न खाता हेल्दी फूड खाणंच पसंत केलं.

वजन वाढवण्यासाठी त्यांना त्यांचं रुटीन ब्रेक करावे लागले ते रोज रात्री उठून चिकन, भाकरी, बदाम, अक्रोड, भात या गोष्टी खात होत्या. याचा परिणाम म्हणजेच त्यांचे वजन एका महिन्यातच 7-8 किलोने वाढले, पण आता शरीराची चरबी वाढत असल्यामुळेच सतत झोप येणे, आळस वाढणे या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागत होतं. तसेच वजन कमी करतानासुद्धा ते त्यांचं रुटीन ब्रेक करून मध्यरात्री ग्रीन टी पिण, डीटॉक्सिकेशनसाठी सॅसी वॉटर पिणं या गोष्टी करू लागल्या. तुमच्या शरीरातली चरबी कमी करण्यासाठी सॅसी वॉटर हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. त्याची रेसिपी इंटरनेटवर उपलब्ध आहे. बारीक होण्यासाठी त्यांचा आरसा व त्यांचं वॉर्डरोब अर्थात त्यांच्या कपाटातले कपडे. जोपर्यंत आपण या कपडय़ांमध्ये पुन्हा आधीसारखे सुंदर दिसत नाही व आपला आरसा जोपर्यंत आपण बारीक झाल्याची पावती देत नाही तोपर्यंत मेहनत करत राहणे हा एकच पर्याय आहे असं त्यांना वाटतं.

या जाड-बारीक होण्याच्या प्रोसेसमध्ये जेव्हा आपल्या व्यायामाला ब्रेक लागतो आणि पुन्हा व्यायामाला सुरुवात करतो तेव्हा आपण सगळं शून्यापासून सुरू केलेलं बरं. कुठलाही आपल्याला माहिती असलेला व्यायामदेखील आपण आपल्या प्रशिक्षकाकडून नव्याने समजून घ्यावा. त्यामुळे दुखापत होत नाही असं त्यांचं ठाम मत आहे. या लेखातून मला एकच सांगावंसं वाटतं की, आपण मराठी माणसं जसं इतर भाषेच्या कलाकारांचं कौतुक करतो. उदाहरण ‘दंगल’या चित्रपटासाठी आमीर खानच्या आधी जाड होणं आणि बारीक होण्याचे व्हिडिओ खूप व्हायरल झाले. त्याच प्रकारे एका भूमिकेसाठी इतकी मेहनत करणाऱ्या स्नेहलतावरसुद्धा कौतुकाचा वर्षाव झालाच पाहिजे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या