थंडीचा सदुपयोग

संग्राम चौगुले

आहार आणि व्यायाम यांचे थंडीत जर योग्य संतुलन राखले तर त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

हिवाळ्यात बरेचसे लोक व्यायाम सुरू करतात. कारण उन्हाळ्यात घाम येतो. शरीरातील पाणी कमी होतं. तसं थंडीच्या दिवसांत काही होत नाही. म्हणून व्यायाम सुरू करण्यासाठी लोक थंडीचा कालखंडच प्रामुख्याने निवडतात. थोडेथोडके नाही तर किमान 90 टक्के लोकांना असंच वाटतं की थंडी सुरू झाली, आता जिम चालू करायची. त्यामुळे बरेच लोक हिवाळ्यात जिम सुरू करतात. तसाही व्यायामासाठी हिवाळा हा खूप चांगला ऋतू आहे. या दिवसांत आपली प्रतिकार शक्ती वाढलेली असते. त्यामुळे आपण हिवाळ्यात जास्त खातो. घाम येत नाही त्यामुळे हिवाळ्यामध्ये पाणी कमी प्यायले जाते. या ऋतूमध्ये भूक चांगली लागते. प्रतिकार शक्ती वाढलेली असल्याने या दिवसांत डाएट चांगले होते.

थंडीच्या दिवसांचा व्यायामासाठी आणखी एक चांगला फायदा म्हणजे या दिवसांत तुम्ही गोड भरपूर खाऊ शकता. कारण शरीरातील उष्मांक जास्त जळतात. हिवाळ्यात गोड खाता येतं हे खरं पण काय गोड खायचं तेही ठवायला पाहिजे. त्यामुळे या दिवसांत तीळगूळ खाण्याची प्रथा ठेवलीय ती कदाचित त्यामुळेच असेल. तीळ आणि गूळ हा एक आहार आहे. हिवाळ्यात वेगळ्या प्रकारचा व्यायाम असत नाही. पण या दिवसांत एक काळजी घ्यायला पाहिजे ती म्हणजे शरीरातील पाणी कमी व्हायला नको. थंडी असो वा उन्हाळा, शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळायलाच पाहिजे. तहान लागत नाही म्हणून बरेचजण पाणी पीत नाहीत. पण पाणी मधूनमधून प्यायलाच पाहिजे.

जे लोक नियमितपणे सकाळी धावण्याचा व्यायाम करतात ते हिवाळ्यात थंडीमुळे करू शकत नाहीत. थंडी जास्त म्हणून सकाळी उठायला होत नाही. अशामुळे व्यायामात खंड पडण्याची शक्यता जास्त असते. अशा लोकांनी सकाळी जमलं नाही तरी दुपारी किंवा संध्याकाळी व्यायाम करायचा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करायचा. त्यात खंड पडू द्यायचा नाही. वर्षाची सुरुवातच थंडीच्या जानेवारी महिन्याने होते. त्यामुळे जिम सुरू करण्याचा संकल्प मोठय़ा उत्साहात केला जातो. पण सकाळच्या कडाक्याच्या थंडीमुळे हे संकल्प बारगळतात. अशा लोकांनी दुपारी किंवा संध्याकाळी व्यायाम केला तर खंड पडणार नाही.

जिम लावा हिवाळ्यात…

हिवाळ्याचे दिवस असले की थंडीमुळे योगा किंवा ऍरोबिकचा खूप कंटाळा येतो. पण जिम सुरू केला असेल तर तेथील प्रशिक्षक तुमच्याकडून ते व्यायामप्रकार करून घेतो. उन्हाळ्यात बागेमध्ये धावण्याचा व्यायाम करता त्यापेक्षा हिवाळ्यात जिम लावणं केव्हाही चांगलं. कारण जिममध्ये इतरांबरोबर आपण व्यायाम करू शकतो. उत्तरायन सुरू झाल्यामुळे आता दिवस मोठा होत जाईल आणि रात्र लहान होईल. त्यामुळे संध्याकाळी वर्कआऊटसाठी चांगला वेळ मिळेल. बागेत जे लोक धावण्याचा व्यायाम करतात त्यांना संध्याकाळी जास्त वेळ मिळेल. जिम दिवसभर चालू असते. तुम्हाला पाहिजे त्या वेळी जाता येईल.