सामना स्टार ….मल्लखांबाची सोनपरी निधी राणे

135

नवनाथ दांडेकर

बालमित्रांनो, मल्लखांब या आपल्या देशी खेळाचा बोलबाला जर्मनीसारख्या प्रगत देशात आहे, पण हिंदुस्थानात मात्र क्रीडा शौकिनांची हवी तशी साथ या हिंदुस्थानी मातीतल्या परंपरागत खेळाला लाभत नाहीय अशी खंत मल्लखांब संघटकांना आहे. कुस्तीपटूंना योगाभ्यासाच्या धर्तीवर व्यायाम मिळावा या हेतूने राजे-महाराजांनी देशात हा खेळ जोपासला, पण आधुनिक जिम्नॅस्टिकसारखी लोकप्रियता मात्र मल्लखांबाला मिळाली नाही. अशा स्थितीत मुंबई शहरात निधी नीलेश राणेसारख्या छोटय़ा मल्लखांबपटूने या खेळात चमक दाखवून राज्यातीलच नव्हे तर देशभरातील क्रीडा शौकिनांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. मल्लखांबासाठी आयुष्य वाहून घेणारे समर्थ व्यायाममंदिरचे उदय देशपांडे व त्यांचे शिष्य राष्ट्रीय मल्लखांबपटू दत्ताराम दुदम यांच्या आशीर्वादाचा आणि शाबासकीचा हात पाठीवर पडलेल्या १३ वर्षीय निधीने तिचे बोरिवली स्पोर्टस् आणि कल्चरल सेंटरचे मल्लखांब प्रशिक्षक आशीष देवल व संचिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. वयाच्या १० व्या वर्षी मल्लखांब या खेळात पदार्पण करणारी निधी आज दोरीच्या मल्लखांबाची सोनपरी बनलीय. येत्या १७ फेब्रुवारीपासून उज्जैन, मध्य प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत निधी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. राज्यासाठी या खेळाचे सुवर्णपदक आणण्याची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशाचे प्रतिनिधित्व करण्याची जिद्द निधीने उरी बाळगली आहे.

गोराईच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेत आठवीत शिकत असलेली निधी राणे हिने वयाच्या दहाव्या वर्षी मल्लखांबात पदार्पण केले. गेली चार वर्षे ती एमएचबी बोरिवली स्पोर्टस् आणि कल्चरल सेंटरमध्ये प्रशिक्षक आशीष देवल आणि संचिता पाटील या राष्ट्रीय मल्लखांबपटूंच्या मार्गदर्शनाखाली दोरीच्या मल्लखांबाचे प्रशिक्षण घेतेय. दररोज ३ तास सराव करणाऱ्या निधीने गेली ४ वर्षे निमंत्रितांच्या स्पर्धा, शालेय स्पर्धा, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबईचे नाव उज्ज्वल केलेय. १२ वर्षांखालील व १४ वर्षांखालील मुलींच्या गटात चारवेळा मुंबई उपनगर संघासाठी चमकदार कामगिरी करीत मल्लखांबातील आपले प्रावीण्य निधीने सर्वांना दाखवले आहे. तिच्या या वाटचालीत तिची आई प्रभा राणे यांचे मोठे पाठबळ मिळाले आहे. प्रशिक्षक व पालकांच्या पाठिंब्यावरच छोट्या निधीने मल्लखांबात मोठी झेप घेतली आहे. दोरीच्या मल्लखांबावरील निधीचे कसब व चपळता पाहून केवळ देशीच नव्हे तर परदेशी मल्लखांब शौकिनांनी तिची पाठ थोपटली आहे. तिच्या या यशाची पोचपावती म्हणून तिला उज्जैन येथील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालीय. या संधीचे आपण सोने करून महाराष्ट्रासाठी पदक मिळवू असा विश्वास निधीने व्यक्त केला आहे.

मल्लखांबात देशाचे नाव उज्ज्वल करायचेय

छोट्या निधीने आता राष्ट्रीय स्तरापाठोपाठ आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या क्रीडा कौशल्याची चमक दाखवण्याची जिद्द बाळगली आहे. आपले गुरू दत्ताराम दुदम, आशीष देवल व संचिता पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत मल्लखांब या खेळात महाराष्ट्राचे व देशाचे नाव उज्ज्वल करणारी कामगिरी साकारण्याचा निर्धार तिने केला आहे. राज्याचा श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार पटकावण्याची महत्त्वाकांक्षाही निधीने उराशी बाळगली आहे. अर्थात खेळाचे कौशल्य जोपासताना आपला शालेय अभ्यास व अन्य छंदातही निधीची प्रगती उल्लेखनीयच राहिली आहे. उज्जैनच्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत निधीकडून चमकदार कामगिरी घडून तिच्या महत्त्वाकांक्षेची पूर्ती होवो अशा शुभेच्छा आपण या मल्लखांबाच्या सोनपरीला देऊया.

 

आपली प्रतिक्रिया द्या