हडपसरमध्ये भीषण अपघातात 1 ठार, 3 जण गंभीर जखमी

दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात मिक्सर कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एक रिक्षाचालक ठार झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंटेनरचालकाने रिक्षानाही धडक देत झाडाला धडकून पलटी झाला. हा अपघात गुरूवारी सकाळी सहाच्या सुमारास घडल्याने परिसरात वाहतूककोंडी झाली होती. घटनास्थळी पोलिस, अग्निशमक दलाने धाव घेत मदतकार्य केले. रणजित जाधव (रा. शेवाळवाडी) असे ठार झालेल्याचे नाव आहे. दिलीप भानुदास कांबळे रा. येवलेवाडी, अनिलकुमार सिंग (रा. धिंडोरी, बिहार), मुन्नासिंग (रा. बिहार) अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास गाडीतळ परिसरात कंटेनर निघाला होता. त्यावेळी गाडीतळ परिसरातील उन्नतीनगरमध्ये अचानक दुचाकीस्वार विरूद्ध दिशेने वाहन चालवित असल्याचे कंटेनर चालकाला दिसून आले. त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी कंटेनर चालकाने रिक्षाला धडक दिली. त्यामुळे त्याचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने इतर चार ते पाच रिक्षांना उडवले. त्यानंतर कंटेनर झाडाला धडकल्याने झाड कोसळून मिक्सर कंटेनर पलटी झाला. यावेळी रिक्षाचालक रणजित कंटेनर खाली सापडल्याने त्यांचा झाला आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

घटनास्थळी अग्निशमक दल आणि पोलीस तत्पर

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमक दल आणि पोलिसांनी धाव घेत मदतकार्य केले. तसेच गंभीर जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. रिक्षावर झाड कोसळल्यामुळे परिसरातील वाहतूक खोळंबली होती. झाड हटविल्यानंतर वाहतूक सुरळित करण्यात आली. दरम्यान, दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी कंटेनर चालकाने इतर वाहनांनीही धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.