जिहादच्या नावाखाली हाफीज सईद दहशतवाद पसरवतोय!

78

सामना ऑनलाईन । लाहोर

मुंबईवरील २६/११ अतिरेकी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदला पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला आता उपरती झाली आहे. हाफीज सईद हा जिहादच्या नावाखाली दहशतवाद पसरवतोय असा स्पष्ट कबुलीनामाच पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने दिला आहे. हाफीज सईदला त्याच्या चार साथीदारांसह ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयीन खंडपीठासमोर हजर करण्यात आले आहे.

हाफीज व त्याच्या सहकाऱ्यांना कडेकोट बंदोबस्तात पाकिस्तानच्या गृह विभागाने शनिवारी न्यायालयासमोर हजर केले. हाफीजने खंडपीठासमोर बाजू मांडताना कश्मिरींसाठी आवाज उठवत असल्यानेच आपल्याला अटक केल्याचा दावा केला. मात्र हा त्याचा दावा गृह मंत्रालयाने फेटाळून लावला असून जिहादच्या नावावर हाफीज दहशतवाद पसरवत असल्याचे तीनसदस्यीय खंडपीठासमोर स्पष्ट केले.

पुरावे सादर करा!
पाकिस्तानने हाफीजसोबत त्याचे साथीदार जफर इकबाल, अब्दुल रहमान आबिद, अब्दुल्लाह उबैद आणि काजी काशिफ नियाज यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याशी संबंधित पुरावे सादर करा असे निर्देश खंडपीठाने दिले असून पुढील सुनावणी उद्या १५ मे रोजी होणार आहे.

राष्ट्रसंघाच्या दबावामुळे ताब्यात घेतले
एकीकडे हाफीजने आपल्याविरुद्धचे आरोप रद्द करण्याची मागणी केली असतानाच पाकिस्तानी गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱयाने हाफीज आणि त्याच्या सहकाऱयांना संयुक्त राष्ट्रांच्या दबावामुळे अटक केल्याची माहिती दिली आहे.

मी कश्मीरच्या आझादीसाठी आवाज उठवतोय
कश्मीरच्या आझादीसाठी आवाज उठवतोय म्हणून आपल्याला अटक करण्यात आली आहे. आजपर्यंत सरकारने आपल्या विरोधात केलेले आरोप सिद्ध झालेले नाहीत, अशी मुजोरी दाखवीत हाफीजने पाकिस्तान सरकारने आपल्या विरोधात केलेले आरोप रद्द करावेत, अशी मागणी न्यायालयासमोर केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या