हाफीज सईद टेरर फंडींग प्रकरण, NIA च्या 3 अधिकाऱ्यांवर कोट्यवधींची लाच मागितल्याचा आरोप

562

राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIA च्या तीन अधिकाऱ्यांवर लाच मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हाफीज सईद याच्या दहशतवादी संघटनेकडून हिंदुस्थानातील मदरशांना मोठ्या प्रमाणावर पैसा पुरवण्यात आल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा राष्ट्रीय तपास संस्था तपास करत आहे. या तपासामध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी ही लाच मागितल्याचा आरोप आहे. या आरोपांमुळे या अधिकाऱ्यांना तपास यंत्रणेतून बाहेर काढण्यात आलं आहे.

ज्या अधिकाऱ्यांवर आरोप आहे त्यामधील एक अधिकारी हा समझोता स्फोटप्रकरणाचा तपास करीत आहे. तर एक अधिकारी हा अधीक्षक दर्जाचा आहे. राष्ट्रीय तपास संस्थेकडे या लाचखोरीप्रकरणी तक्रार करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी महासंचालकपदाच्या अधिकाऱ्याकडून केली जात आहे.

टेरर फंडींग प्रकरण आहे तरी काय ?

मुंबईवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात उद दावा संघटनेचा म्होरक्या हाफीज सईद याच्या दहशतवादी संघटनेशी  ‘फलाह -ए- इंसानियत’ नावाच्या संघटनेशी थेट संबंध आहे. लोकांना सांगण्यासाठी ही सामाजिक संघटना आहे मात्र या संघटनेद्वारे दहशतवादी कृत्यांना आर्थिक रसद पुरवण्याचे काम केले जाते. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सलमान नावाच्या एका दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान सांगितलं होतं की हरियाणा आणि राजस्थानात मशिदी बनवण्यासाठी त्याला पाकिस्तानातून आर्थिक मदत देण्यात आली होती. हा पैसा ‘फलाह -ए- इंसानियत’ या संघटनेकडून मिळाल्याचं त्याने सांगितलं होतं.

 

आपली प्रतिक्रिया द्या