केसरबाई दुर्घटनेचे ‘हैदरी मंझिल’ला हादरे, ट्रस्टच्या नाकर्तेपणामुळे 22 भाडेकरू मृत्युच्या छायेत

41

सामना प्रतिनिधी, मुंबई

डोंगरीत कोसळलेल्या केसरबाई बिल्डिंगपासून काही फुटांवर असलेल्या ‘हैदरी मंझिल’ची सुरक्षा टांगणीला लागली आहे. ‘केसरबाई’ची मालकी असलेली खोजा जमात ट्रस्ट हीच या बिल्डिंगच्या सुरक्षेबाबत गंभीर नाही. त्यामुळे आम्ही मेल्यानंतरच पुनर्विकास करणार का, असा संतप्त सवाल मृत्यूच्या छायेत राहणारे 22 भाडेकरू करत आहेत.

डोंगरीत केसरबाईप्रमाणेच कित्येक बिल्डिंग जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत. हैदरी मंझिलही त्यातीलच एक. 100 हून अधिक वर्षे झालेल्या या बिल्डिंगचा पुनर्विकास रहिवाशांच्या म्हणण्यानुसार जागामालकाच्या नाकर्तेपणामुळे रखडला आहे. चार माळ्यांच्या बिल्डिंगमधील 22 घरांमध्ये किमान 80 ते 90 लोक राहतात. तळमजल्याच्या एण्ट्रीलाच उघडा मीटरबॉक्स आणि विजेच्या तारांचे जाळे आहे. येथून अधूनमधून शॉर्टसर्किट होते. त्यामुळे आग लागण्याची भीती रहिवासी व्यक्त करतात. भिंतीला तडे, केव्हाही कोसळेल अशा स्थितीत गेलेले फ्लोअरिंग, लाकडी जिन्यांचे खिळे निखळलेले, छप्पराला वाळवी, जागोजागी टेकू या दयनीय स्थितीने हैदरी मंझिलच्या भाडेकरूंची झोप उडाली आहे.

दहा-बारा वर्षांपासून बिल्डिंग कमकुवत झाली आहे. दुर्घटनेच्याच भीतीने तळमजल्यावरील डिस्पेन्सरीचा चालक निघून गेला. ते दोन गाळे दहा वर्षांत एकदाही उघडले नाहीत. त्यामुळे बिल्डिंगचा पाया आणखी कमकुवत बनल्याचा दावा रहिवासी करतात.

आम्ही अक्षरशः नरकयातना भोगतोय. ट्रस्टने आम्हाला वाऱ्यावर सोडलेय. केवळ घरे खाली करण्यासाठी नोटिसा बजावल्या जातात. पण आम्ही राहायचे कुठे? ट्रान्झिट कॅम्प आहेत कुठे? आमच्या चार-पाच पिढय़ा इथे गेल्या. मुलांचे शिक्षण, धंदे, नातेवाईक सगळे काही इथे आहे. याच परिसरात पुनर्वसन का करत नाही? म्हाडाचा एका समुदायाला एक आणि दुसऱ्या समुदायाला एक असा भेदभाव सुरू आहे.
– शिबू सय्यद, रहिवासी

आम्ही 40 वर्षे इथे राहतोय. पुनर्विकासाबाबत ट्रस्टसोबत दोन ते तीन वेळा मीटिंग झाल्या. ट्रस्टला आमच्या सुरक्षेचे काहीएक पडलेले नाही. पुनर्विकासासाठी मी 50 टक्के रक्कम देतो. उरलेले 50 टक्के रहिवाशांनी जमा करावेत. तसेच मी दिलेली 50 टक्के रक्कम दोन वर्षांत द्यावी अशी अट ट्रस्ट घालतेय. ट्रस्टने 100 टक्के रक्कम द्यावी व त्याची परतफेड करण्यासाठी वाढीव मुदत द्यावी.
– जाहीर टोपीवाला, रहिवासी

ट्रस्ट आमची फसवणूक करतेय. मे 2008 ला पहिल्यांदा नोटीस दिली. त्यानंतर सप्टेंबर 2008, पुढे 2012 मध्ये आणि आता 22 जुलै 2019 ला नोटीस बजावलीय. केवळ पोस्टाच्या माध्यमातून नोटिसांचा धडाका लावलाय. रहिवाशांची बाजू जाणून घेण्यासाठी ट्रस्टमधून कोणी पुढे येत नाही. म्हाडा आम्हाला मानखुर्द, चेंबूरला जायला सांगतेय. आम्ही काय गटारातील किडे आहोत का?
– दानिश खान, रहिवासी

आमच्याकडे दुसरे घर नाही. आर्थिक परिस्थिती नाही म्हणून जीव मुठीत धरून जगतोय. ट्रस्टवाले केवळ फसवणूक करताहेत. घरात पाणी गळतेय. केसरबाई बिल्डिंग कोसळल्यापासून झोप उडालीय. बिल्डिंग कधीही कोसळेल असेच सारखे वाटतेय. फुटपाथवर नको म्हणून इथे राहतोय. भाडे देण्याची ऐपत नाही. ट्रस्टने पुरेसे भाडे दिले तर या परिसरात घर भाडय़ाने घेऊन राहू.
– सय्यद मोहम्मद हुसैन, रहिवासी

आपली प्रतिक्रिया द्या