जालना जिल्ह्याला गारपिटीने झोडपले

139

सामना प्रतिनिधी । जालना

सकाळी सातची वेळ, प्रत्येक जण सकाळच्या कामात व्यस्त आकाश झाकाळून आले. सर्वत्र अंधार पसरला. सोसाट्याचा वारा सुटला. आणि तुफान गारपिटीला सुरुवात झाली. क्षणात सर्वच संपले अवघ्या पंधरा मिनिटांतच होत्याचे नव्हते झाले. उषः काल होता होता काळ रात्र झाली… शेतकऱ्यांच्या मागचे दुष्टचक्र संपता संपत नसून यापूर्वी शेतकऱ्यांच्या कापसावर गुलाबी बोंडअळीने हल्ला चढवला होता. या हल्ल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले. शेतकऱ्यांनी कापूस मोडून ऊस, टरबून, गहू, हरभरा, कांदा केला. मात्र आज झालेल्या तुफान गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. जिल्ह्यातील जालना, अंबड, परतूर, जाफराबाद या तालुक्यांना गारपिटीचा तडाखा बसला. यामुळे ऊस, हरभरा, कांदा, टरबूज, ज्वारी याच बरोबर द्राक्ष, डाळिंब, मोसंबी, लिंबू या फळबागांनाही फटका बसला. जिल्ह्यातील फूलशेती संपली. तर शेतकऱ्यांनी शासनाच्या मदतीने उभारलेले शेडनेट जमीनदोस्त झाले.

जालना तालुक्यातील शहरासह, दरेगाव, रेवगाव, कडवंची, रामनगर, वाघ्रुळ, वंजार उम्रद, नाव्हा, गोंदेगाव, सिंदखेड, पोखरी, कुंभेफळ, इंदलकरवाडी, धावेडी, धार, नंदापूर, घाणेवाडी, अंतरवाला, गोलापांगरी आदींसह ५१ गावांना गारपिटीचा तडाखा बसला.

मंठा तालुक्यात पिकांचे नुकसान
मंठा : तालुक्यात ५५ गावांमध्ये सकाळी गारपीट झाली. या गारपिटीने पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील मंठा, उमरखेडा, तळणी, ऊस्वद, देवठाण, खोरवड या गावांसह इतरही गावांना कमी- अधिक प्रमाणात गारपिटीचा फटका बसला आहे. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे रब्बी पिकासह फळबाग, भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मंठा शहरात सुद्धा गारांचा ढीग रस्त्या रस्तावर,गल्लीबोळात,घराच्या अंगणात, गच्चीवर साचला होता.

तळणी परिसरातही प्रचंड नुकसान
तळणी : तळणी परिसरातील देवठाणा, उस्वद, खोरवड, अभोरा शेळके, किनखेडा, उमरखेड या गावांतील काही भागात प्रचंड गारपीट झाली. या गारपिटीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये शेडनेटवर गाराचा खच्च साचल्याने नेटसेट मोडून पडले. या मधील टॅमोटो व मिरची याचबरोबर टरबूज, हरभरा, कांदा, गहू, ज्वारी, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. केळी, मोसंबी या फळबागाचे नुकसान झाले. या गारपिटीत हाताशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून तातडीची मदत द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकरी शरद दहातोंडे, अशोक मोरे, बंडू मोरे, परमेश्वर मोरे, एकनाथ मोरे, सुभाष देशमुख, सुरेश सरोदे, वामन चट्टे, गजानन राऊत, मुकुंद पुरी, राम चट्टे,गोविंद नवघरे, अमोल नवघरे,वसंत सरोदे, रामप्रसाद सरोदे, अशोक सरोदे यांनी केली.

परतूरमध्ये गारांसह पाऊस
परतूर : तालुक्यात ७ गावांत गारपीट झाली. काही गावांत हलक्या प्रमाणात गारा त्यासोबत मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊन या अस्मानी संकटाने मोठे नुकसान झाले नसले तरी तालुक्यातील उस्माननपूर, होंडेगाव, चिंचोली, गणेशपूर, हनवडी, तोरणा, मापेगाव, सातोना (खु.), सातोना (बु.) शिवारात मध्यम ते हलकी गारपीट झाली. श्रीष्टी विभागात वाहेगाव श्रीष्टी, तर आष्टी विभागात आष्टी ,सावरगाव,सोपारा, डोणवाडी, आदी गावात सकाळी ६ ते ७ वाजेच्या सुमारास हलक्या गारासह पाऊस पडला. वादळी वारे नसल्याने व गारांचा आकार लहान असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नसले तरी आंबा मोहर, काढणीला आलेली ज्वारी, करडाई, हरबरा, गहू यांचे नुकसान झालेले आहे. परतूर शहर तसेच सातोना भागात दुपारी ३ वाजेच्या सुमारास मध्यम ते जोरदार स्वरूपाचा अर्धा तास विजेच्या गडगडाटात पाऊस पडल्याने काढणीला आलेल्या ज्वारी, करडईला फटका बसला. आंबा मोहरालाही पावसाने चांगलाच फटका बसलेला आहे. दुपारी पावसासोबत गारपीट झाली नसल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम यांनी तातडीने गारपीटग्रस्त भागात जाऊन पिकांची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत माहिती घेतली. शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा वास्तव अहवाल पाहणी करून तयार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

आष्टी परिसरात गारपीट
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी व परिसरात सकाळच्या सुमारास पाऊस व गारपीट सुरू झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हातची आलेल्या पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. रात्रीपासूनच ढगाळ वातावरण होते. अचानक सकाळी आष्टी, काऱ्हाळा, रायगव्हाण, संकनपुरी, सोपारा वाहेगाव, ढोणवाडी, आसनगाव या गावांसह परिसरातील सर्वच गावांमध्ये पावसासह काही प्रमाणात गारपीट झाली यात शेतकऱ्यांचे शेतातील आंबा, ज्वारी, गहू, हरभरा, केळी अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले. दिवसभर ढगाळ वातावरण पसरले होते.

अंबड तालुक्यातही जबर फटका
अंबड : अंबड तालुक्यातील ५३ गावांना गारपिटीचा तडाखा बसला. तर अंबड शहरासह रोहिलागड, शहागड, गोंदी परिसरात ही अवकाळी बरसला. जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा बसला आहे. शहरासह तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. तर अंबड शहरात गारांचा पाऊस झाला आहे. त्यामुळे फळबागांसह गहू, आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर काही काळ जोरदार पाऊसने हजेरी लावली. शहरासह बहुतांश भागात आज सकाळी आठ वाजता वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ पडलेल्या टपोऱ्या गारांमुळे रस्त्यावर, शेतात गारांचा पांढरा खच साचला होता. गारांमुळे तालुक्यातील द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी, गहू, हरभरा, कांदा पिकांसह तालुक्यात शेडनेट हाऊसचे नुकसान झाले आहे. अर्ध्या तासानंतर आकाश पांढरेशुभ्र होऊन ऊन पडले. वातावरणामध्ये सध्या कमालीचा गारवा आहे. रविवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर गारांसह जोरदार पाऊस बरसला. साधारण संत्र्याच्या आकाराएवढी मोठी गार येथे पाहावयास मिळाली. जवळपास दहा मिनिटे हा गारांचा जोरदार वर्षाव येथे सुरू होता. तालुक्यातील वडीगोद्री, शहागड यासह अन्य गावांमध्येही हा गारांचा वर्षाव झाला. यामुळे हरभरा, कापूस व गव्हाच्या पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात दोन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. आज गरपिटीचा फटका बसला आहे. रविवारी सकाळच्या सुमारास काही भागात अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकऱ्यांवर जणू आभाळच कोसळले. वाकद परिसरात वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याने उरलासुरला रब्बी हंगामही हातचा जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या