संभाजीनगरसह मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या तीन विभागांमध्ये मध्यम स्वरुपाचा ते तीव्र स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुणे, नगर, नाशिक, संभाजीनगर, जालना, जळगांव, बुलढाणा, वाशिम,चंद्रपूर, नागपूर, अमरावती या जिल्ह्यातील काही भागात गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा, द्राक्ष आदी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणे शहर आणि आसपासच्या भागात बुधवारी रात्री पाऊस पडला. गुरुवारी सकाळी नाशिक शहर आणि आसपासच्या परिसरात गुरुवारी सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली आहे. गेले दोन आठवडे नाशिक शहरात नागरिकांना सुर्यदर्शन झालेलं नसून इथे सातत्याने ढगाळ वातावरण आहे. या दोन शहरांमध्ये काही तासांसाठी पावसाची संततधार पाहायला मिळाली. मुंबई, ठाण्यामध्येही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या असून पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टीलगतच्या भागात पाऊस पडेल असा अंदाज आहे. मुंबई, ठाण्यातही शनिवारपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.