
>> देविदास त्र्यंबके
गेल्या वर्षीची अतिवृष्टी आणि यंदाच्या गारपिटीने मराठवाडय़ात बरबादी आणली आहे. 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने खरिपाच्या तब्बल 32 लाख हेक्टरवरील तर यंदाच्या अवकाळीने दीड लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल केला! सरकारने पंचनामे करण्याचे तोंडी आदेश दिले, पण कर्मचारी संपावर गेल्याने त्या कामालाही अजून मुहूर्त लागलेला नाही. मागच्या वर्षी जाहीर करण्यात आलेली अतिवृष्टीची मदत अजून सरकारच्याच खिशात आहे. त्यामुळे यंदाच्या अस्मानी संकटात काही पदरी पडेल, याची आशाच शेतकऱयांनी सोडून दिली आहे.
मराठवाडय़ात गेल्या वर्षी पाऊस दिवाळी संपली तरी मुक्कामी होता. अतिवृष्टीने शेतशिवाराचे तलाव झाले. कापूस, सोयाबीन, मका, तुरीचे पुरते वाटोळे झाले. मराठवाडय़ाच्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर तसेच धाराशीव या 8 जिह्यांत खरिपाचे एकूण पेरणी क्षेत्र 48,57,152 हेक्टर एवढे आहे. त्यापैकी 48,22,689 हेक्टरवर पेरणी झाली होती. पिके ऐन काढणीला येताच पावसाने आपले रौद्ररूप दाखवले. 32,23,172 हेक्टरवरील पिकांची माती झाली. शासनाच्या निकषानुसार 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. सरकार दरबारी पंचनाम्यांचे गठ्ठेच्या गठ्ठे गेले. 4,480 कोटी रुपयांची मदत जाहीर झाली, पण सरकारच्याच खिशात अडकली!
खरीप हंगाम हातचा गेला, पण मराठवाडय़ातील शेतकऱयांनी रब्बीची जोजवण केली. पण गहू, ज्वारी, मका, कापूस काढणीत असतानाच अवकाळीचे संकट चालून आले. धाराशिव वगळता उर्वरित मराठवाडय़ात तब्बल दीड लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. राज्य सरकारने मोठय़ा आवेशात पंचनामे करण्याचे तोंडी आदेश दिले, पण याच काळात सरकारी कर्मचाऱयांचा संपामुळे पंचनामे रखडले.