‘हलाला’साठी मित्रासोबत बायकोच्या घरी गेला, AIMIM च्या माजी नेत्याविरूद्ध गुन्हा दाखल

बहुपत्नीत्व, हलाला यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या महिलेने आपल्यावरच हलालासाठी जबरदस्ती करण्यात आल्याची पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. दिल्लीत दाखल झालेल्या या तक्रारीमुळे खळबळ उडाली आहे. पीडित महिलेने तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीविरोधात हलालासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे. याला नकार दिल्याने त्याने आपल्याला मारहाण केल्याचं पीडितेने तक्रारीत म्हटलंय. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पिडिता आपल्या मुलासोबत दिल्लीतील जामिया नगर भागात राहाते. जानेवारी 2012 साली तिचा रियाझुद्दीनसोबत निकाह झाला होता. आपला तलाक झाला आहे असं खोटं सांगून त्याने आपल्याशी निकाह केला होता असं पिडितेने म्हटलंय. लग्नानंतर पिडितेला कळालं की रियाझुद्दीन हा विवाहीत आहे. तिने याबद्दल त्याला जाब विचारला असता त्याने पिडितेला त्रास द्यायला सुरुवात केली. रियाझुद्दीनची पहिली बायको देखील आपल्याला त्रास द्यायला लागली असं तक्रारदार महिलेने म्हटलंय. अवघ्या काही महिन्यांतच रियाझुद्दीननने आपल्याला तलाक दिला आणि घरातून हाकलून दिलं असं या महिलेचं म्हणणं आहे. यानंतर दोघांत कोणताही संबंध उरला नव्हता.

पिडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की 19 ऑगस्टला रियाझुद्दीन त्याच्या एका मित्रासोबत तिच्या घरी आला होता. तुला तलाक देऊन आपण मोठी चूक केली असून मला तुझ्यासोबत पुन्हा लग्न करायचं आहे असं त्याने या महिलेला सांगितलं. पुन्हा लग्न करण्यासाठी पीडितेने हलाला करावा आणि त्यासाठी आपण आपल्या या मित्राला सोबत आणलं आहे असं रियाझुद्दीनने या महिलेला सांगितलं. याला विरोध केल्याने रियाझुद्दीनने पिडितेचे कपडे फाडले आणि तिला बेदम मारहाण केली. महिलेचा आरडाओरडा ऐकून शेजारपाजारचे धावत आले, ज्यांना घाबरून रियाझुद्दीन पळून गेला.

हलाला म्हणजे काय ?

जिला तलाक दिला आहे, त्याच महिलेसोबत पुन्हा निकाह करणे याला हलाला म्हणतात. मात्र यासाठी त्या महिलेला दुसरा निकाह करावा लागतो आणि त्या दुसऱ्या नवऱ्याला तलाक द्यावा लागतो, तोपर्यंत तिचा दुसऱ्या नवऱ्यासोबत तलाक होत नाही तोपर्यंत तिचा पहिला नवरा तिच्याशी पुन्हा निकाह करू शकत नाही. याला हलाला असं म्हणतात.

पीडितेने तक्रारीत म्हटलंय की रियाझुद्दीन हा एमआयएम पक्षाचा उत्तर प्रदेशासाठीचा सचिव आहे. रियाझुद्दीनने मात्र हा आरोप खोटा असून आपण आठवडाभरापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचं सांगितलंय. रियाझुद्दीनने दावा केला आहे की तक्रारदार महिला खोटं बोलत असून तो आठवडाभर दिल्लीला गेलाच नाहीये.

आपली प्रतिक्रिया द्या