देशातील निम्मे एटीएम होणार बंद, आरबीआयच्या नियमांमुळे अडचणी वाढल्या

सामना प्रतिनिधी । मुंबई

सध्या क्रेडिट आणि डेबिट कार्डाचे युग आहे. अनेकजण पाकिटात पैसे बाळगण्यापेक्षा कार्ड बाळगणे पसंत करतात. असे असताना देशात एटीएमची संख्या कमी होत चालली आहे. गेल्या दोन वर्षांत 6158 एटीएम बंद झालेले आहेत. आरबीआयने लागू केलेल्या कडक नियमांमुळे निम्मे एटीएम बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या वर्षी देशातील काही महत्त्वाच्या आर्थिक संस्थांनी एटीएम बंद होण्याबाबत अंदाज व्यक्त केला होता. कॉन्फिडेरेशनल ऑफ एटीएम इंडस्ट्री या संस्थेने हिंदुस्थानात 2019 साली अध्र्यापेक्षा जास्त एटीएम बंद होऊ शकतात, असा दावा केला होता. त्यांनी एक सर्वेक्षण केले, त्या सर्वेक्षणात देशातील एटीएमची संख्या कमी झाली आहे. देशात एकूण 2 लाख 38हजार एटीएमची नोंदणी करण्यात आली होती. त्यातील जवळपास एक लाख 13 हजार एटीएम बंद करण्यात आले आहे, या सर्वेक्षणात म्हटले आहे.

ब्रिक्स देशांमध्ये (ब्राझिल, रशिया, हिंदुस्थान, चीन) याबाबतीत हिंदुस्थान आधीच पिछाडीवर असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

एटीएम ऑपरेटर्सला प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये
एटीएमची सुरक्षा वाढल्याने एटीएम ऑपरेटर्ससाठी व्यवहार कठीण झाला आहे. ऑपरेटरला एटीएममधून डेबिट/ क्रेडिट कार्डातून होणाऱ्य़ा प्रत्येक व्यवहारावर संबंधित बँकेतून इंटरचेंज फी म्हणून 15 रुपये मिळतात. एटीएमची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण इंटरचेंज फी आहे, असे माजी डेप्युटी गव्हर्नर आर गांधी यांनी सांगितले. बँक ही फी देणे पसंत करते, कारण स्वतः एटीएम ऑपरेट करण्यापेक्षा हे जास्त स्वस्त आहे.