Killer dolphins? डॉल्फीनच्या मदतीने दहशतवाद्यांवर हल्ला ? हमासचा इस्रायलवर आरोप

हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर नवा आरोप केला आहे. डॉल्फीनची मदत घेऊन इस्रायलने आपल्या दहशतवाद्यांवर हल्ला केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. समुद्री कारवाया करणारं हमासच्या दहशतवाद्यांचं एक पथक असून या दहशतवाद्यांना फ्रॉगमन असं म्हणतात. यातल्या काही दहशतवाद्यांवर डॉल्फीनने हल्ला केला असून हे डॉल्फीन इस्रायलने प्रशिक्षित केले असल्याचा हमासला दाट संशय आहे. हमासने एक व्हिडीओ जारी केला असून त्यामध्ये त्यांनी डॉल्फीनद्वारे आपल्या सहकाऱ्यांचा खात्मा करण्यात आल्याचं म्हटलंय.

हमासचे दहशतवादी समुद्री मार्गाने काहीतरी कारवाया करत असताना त्यांच्या समुद्रीपथकाचा डॉल्फीन्सने पाठलाग केला होता. या डॉल्फीनच्या शरीरावर दहशतवाद्यांना ठार मारता यावं यासाठीची काही शस्त्रेही बसविण्यात आली होती असं या दहशतवादी संघटनेच्या नौदल प्रवक्त्याचं म्हणणं आहे. जो ट्रुझमन नावाच्या एका युद्धतज्ज्ञाने हमासचा हा व्हिडीओ ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

डॉल्फीनच्या शरिरावर दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी नेमकं कशाप्रकारचं अस्त्र लावण्यात आलं होतं आणि ते कसं काम करतं हे मात्र कळू शकलेलं नाहीये. 2015 साली काही डॉल्फीनच्या अंगावर कॅमेरे आणि भालाफेक करणारी बंदूक बसवून ते समुद्रात सोडण्यात आले होते असा दावा यापूर्वीही हमासच्या दहशतवाद्यांनी केला होता. त्यावेळी एक डॉल्फीन आपण पकडला होता असंही हमासचं म्हणणं होतं, मात्र त्याचं पुढे काय झालं हे कळू शकलेलं नाही. इस्रायलने मारेकरी डॉल्फीन सोडल्याच्या हमासच्या या दाव्याची अनेकांनी खिल्ली उडवली आहे. चित्रपटात दाखवतात तसे डॉल्फीनच्या डोक्यावर लेझर बसवलेले का ? असा प्रश्न विचारत हमासच्या दहशतवाद्यांची मस्करी केली जात आहे.

यापूर्वीही इस्रायलवर प्राण्यांच्या मदतीने हल्ले केल्याचे आरोप करण्यात आले आहे. 2010 साली इजिप्तमधील दक्षिण सिनाई भागाचे राज्यपाल मोहम्मद फादील यांनी आरोप केला होता की शर्म-अल-शेख इथे शार्कच्या माध्यमातून इस्रायलने पर्यटकांवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न होऊ शकतो इजिप्तचा पर्यटनउद्योग बरबाद करण्यासाठी इस्रायल प्रयत्नशील असल्याचा त्यांचा दावा होता.  2011 साली एका गिधाडाला सौदी अरेबियात पकडण्यात आलं होतं. त्याच्या पायाला असलेलं ट्रॅकींग उपकरण पाहून इस्रायलने आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी हे गिधाड पाठवलं असल्याचा सौदी अरेबियाला संशय वाटायला लागला होता.