हंपी एक प्रवास, भूतकाळातून भविष्याकडे !

1324

पाऊलखुणा    >> > प्रा. सूरज अ. पंडित

जागतिक वारसा यादीत समावेश झालेल्या कर्नाटकातील हंपी येथे  ९ जानेवारीपासून हंपी महोत्सव साजरा केला जात आहे. विजयनगरच्या गतवैभवाच्या खुणा, हंपीची संस्कृती, तिथलं कलासौंदर्य याचा हा वेध.

छत्रपती शिवरायांना आदर्शवत वाटणारे मध्ययुगीन साम्राज्य म्हणजे विजयनगर ! त्याची ही राजधानी. एक स्वप्नवत नगरी. हिंदुस्थानच्या मध्ययुगीन सुवर्णकाळाचा साक्षीदार. तत्कालीन युरोपातील प्रवासीही या नगरीच्या सुसंस्कृत श्रीमंतीने भारावले होते. वाल्मीकी रामायणातील किष्किंधा कांडातील पंपाक्षेत्राशी नाते सांगणारी ही नगरी. या नगरीच्या गतकाळाला अनेक कथांची कोंदणे आहेत. मग त्या पुराणातील कथा असोत, वाल्मीकी रामायण असो, विद्यारण्यस्वामींच्या कथा असोत किंवा लहान थोरांना भावणाऱया तेनाली रामाच्या गोष्टी असोत. विजयनगरच्या गतवैभवाची ही एक आठवणच आहे.

दिल्लीश्वर मुहम्मद बीन तुघलकाच्या सार्वभौम सत्तेला तडा देणारा उठाव १३३६ साली हरीहर आणि बुक्क या दोन भावांनी केला. विद्यारण्य स्वामींच्या मार्गदर्शनाखाली या दोघा भावांनी संगम घराण्याच्या अधिपत्याखाली विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. पुढे ३०० वर्षे या विजयनगर साम्राज्याची विजयपताका फडकत होती. १५६५ मधील तालिकोटच्या युद्धापर्यंत या दक्षिणेतील हिंदुपतपातशाहीकडे वाकडय़ा नजरेने पाहिलं असे राज्य अस्तिस्वात नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच विजयनगर साम्राज्याकडून प्रेरणा घेऊन तोरणा घेतला आणि सहाच वर्षांत विजयनगरच्या वारसाच्या शेवटच्या युद्धाला सुरुवात झाली.

अशा या विजयनगर साम्राज्याची राजधानी हंपी. हे शहर विजयनगर या नावानेही ज्ञात आहे. १९८६ साली या शहराच्या सांस्कृतिक अवशेषांना जागतिक वारशाचे स्थान देण्यात आले. हे स्थळ एक आदर्श मध्ययुगीन पुरातत्वीय स्थळ आहे. इथे राजवाडा, मंदिरे, शिल्प, इमारती असे अनेक प्रकारचे पुरावशेष आहेत. याहूनही महत्त्वाचे म्हणजे येथील जलव्यवस्थापन. खडकाळ टेकडय़ांच्यामधून वाहणाऱ्या तुंगभद्रेच्या काठी हे पुरातन अवशेष आजही त्यांच्या गतवैभवाची कथा सांगत आहेत. या शहराला एका बाजूने तुंगभद्रेचे आणि इतर बाजूंनी खडकाळ टेकडय़ांचे नैसर्गिक संरक्षण होते. इथल्या प्रत्येक दगडाला, मातीच्या प्रत्येक कणाला इतिहास आहे.

मुख्य बाजार भागात असलेले विरुपाक्ष मंदिर विशेष महत्त्वाचे. विजयनगरच्या उदयाच्या आधीपासूनच साधारण ९ व्या शतकात येथील द्राविड पद्धतीच्या प्रासादाची निर्मिती झाली असे मानले जाते. पुढे अनेक स्थित्यंतरातून जात आजही हे मंदिर उभे आहे. १५६५ मधील युद्धातील विजयनगरच्या पराजयानंतरही या मंदिराचे महत्त्व अबाधित राहिले. या मंदिराच्या मुखमंडपाच्या छतावर विद्यारण्यस्वामींचे एक चित्र आहे. या मंदिराशी विजयनगर साम्राज्याची अस्मिता जोडलेली होती. हेमकूट टेकडीवरील तथाकथित जैन मंदिरेही विजयनगरपूर्व काळातील असावी असे मानले जाते.

हंपीचे सर्वात प्रसिद्ध आणि स्थापत्याचा सर्वश्रेष्ठ आविष्कार असलेले मंदिर म्हणजे विठ्ठल मंदिर. भव्य प्रकारामध्ये बांधला गेलेला हा प्रासाद म्हणजे विजयनगर साम्राज्यातील कलाविष्काराचा मेरुमणी होय. येथील अलंकर, शिल्पे, दगडी रथ आणि प्रत्यक्ष मंदिर हे सारेच स्वप्नवत आहे. काही विद्वान या मंदिराचा संबंध लोकपरंपरेच्या आधारे पंढरपूरच्या विठोबाशी जोडतात. कृष्णदेवरायाने हे मंदिर पंढरपूरच्या विठोबासाठी बांधल्याचा लोकपरंपरेचा दावा आहे. हे वाच्यार्थाने खरे नसले तरी लक्ष्यार्थाने सत्यच आहे. याशिवाय अच्युतराया मंदिर, चंद्रमौलेश्वर मंदिर असे अनेक देवप्रासाद येथे घडवले गेले. यापैकी आणखी एक उल्लेखनीय म्हणजे हजार राम मंदिर. या मंदिरावर कदंब शैलीचा प्रभाव जाणवतो. येथील उत्थितशिल्पे विशेष आहेत. रामायणातील अनेक प्रसंगांचे चित्रण वेधक आहे.

हंपी जसे मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे तसेच जलव्यवस्थापनासाठीही. बारमाही दुथडी भरून वाहणारी तुंगभद्रा, तिच्यातून काढलेले कालवे आणि पन्हाळी, विविध तळी, विहिरी आणि परिसरातील डोंगरातून जन्माला आलेले पाण्याचे विविध नैसर्गिक स्रोत. या साऱयाचा कल्पकतेने अहर नियोजनात वापर केलेला दिसतो. येथील पुष्करिणी विशेष आहे. तसेच कृष्णमंदिरातील धार्मिक विधींसाठी बांधलेला तलाव उल्लेखनीय आहे. राजवाडय़ासाठी तसेच सामान्यांसाठीही उत्तम पाण्याची व्यवस्था केलेली दिसते. १४ व्या शतकातील तुंगभद्रेवर बांधलेल्या एका दगडी पुलाचे अवशेषही येथे पहायला मिळतात. राजवाडय़ाचे अवशेष, राणीवश्याची जोती, हत्तीखाना, टांकसाळ, दंडनायकाचा म्हणून ओळखला जाणारा महाल, भोजनशाळा आणि सामान्यांच्या घराची जोती अशा एक ना दोन, अनेक स्थापत्यावशेषाची जंत्री देता यईल. हंपीच्या मूर्तिवैभवातील मेरुमणी म्हणजे लक्ष्मीनृसिंह आणि गणेशाची महाकाय एकल शिल्पे.

कर्नाटकातील सुवर्णयुगाच्या या खुणा पाहण्यासाठी आज जगभरातून पर्यटक येतात. हिंदुस्थानी सांस्कृतिक पर्यटनामध्ये हंपीचे स्वतःचे अढळ स्थान आहे. विजयनगर साम्राज्याच्या कर्नाटकातील योगदानाचा कानडी जनतेला सार्थ अभिमान आहे. दरवर्षी कर्नाटक सरकार हंपी महोत्सवाचे आयोजन करते. हंपीला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दरवर्षी भरच पडत आहे. या सांस्कृतिक पर्यटनाकडे सरकार विशेष लक्ष पूरवत आहे. हंपीच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी ‘हंपी वल्ड हेरिटेज एरिया मॅनेजमेंट ऑथॉरिटीची’ स्थापना केली आहे. यांच्या अंतर्गत हंपी येथील अवशेषांची देखभाल आणि परिसराचा विकास यासंदर्भात तज्ञांच्या सल्ल्याने मार्गदर्शनाखाली उपक्रम राबवले जातात. हीच भविष्यकाळाची गरज आहे. पर्यटन स्थळांचा विकास आणि वारसा पर्यटनासंबंधित योग्य धोरणे हेच या वारशाचे आणि प्रादेशिक अस्मितेचे भविष्य ठरवणार आहे आणि हंपीच्या उदाहरणातून कर्नाटक सरकार या साऱयाचा सांगोपांग विचार करून पावले उचलताना दिसत आहेत.

महाराष्ट्र आणि कर्नाटक हे केवल भौगोलिक शेजारी नसून सांस्कृतिक दृष्टय़ा एकाच परंपरेचा भाग आहेत. छत्रपती शिवरायांच्या रूपाने महाराष्ट्राने विजयनगरच्या सुवर्णयुगाची धुरा वाहिली. आज आपण यातून काही शिकणार आहोत का? महाराष्ट्रातील हंपीच्या तोडीचे एक प्राचीन शहर आजही उपेक्षिताचे जीवन जगत आहे. दौलताबाद…. देवगिरी, ज्या शहराने महाराष्ट्राचे व्यक्तिमत्त्व घडवले. हे भग्न शहर महाराष्ट्राच्या सुवर्णयुगाची साक्ष देते. कर्नाटक आपल्या पूर्वजांच्या स्मृती अभिमानाने मिरवते आहे. परंतु महाराष्ट्राच्या गतवैभवाच्या साक्षीदारांचे भविष्य काय आहे, याचे उत्तर अजून आपल्याला सापडलेले नाही.

(लेखक ज्येष्ठ पुरातत्व तज्ञ असून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयाचे अभ्यासक आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या