लातूरात कापडी पिशव्या व कचर्‍यापासून तयार केलेल्या खताचे लुटले वाण

68

सामना प्रतिनिधी । लातूर

आपला प्रभाग आणि परिसरा सोबतच संपूर्ण शहर स्वच्छ व सुंदर व्हावे, या संकल्पनेतून उपक्रम राबवणार्‍या कव्हेकर परिवाराने प्रभागातील कचर्‍यापासून तयार केलेल्या खताचे वाण लुटले. या माध्यमातून नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांची संकल्पना प्रत्येक घरात पोचविण्याचा प्रयत्न करताना महिलांनी आपल्या घरातील ओला व सुका कचरा वर्गीकरण करून दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानण्यात आले. वेगवेगळे, अनोखे उपक्रम राबविण्यात अजित पाटील कव्हेकर अग्रेसर असतात. याच माध्यमातून त्यांनी गतवर्षी प्रभाग स्वच्छ करताना जमलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून त्यापासून खत तयार करण्याचा उपक्रम सुरू केला होता. या माध्यमातून कचरा जमा करताना ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याचे आवाहन त्यांनी महिलांना केले होते.

महिलांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या प्रतिसादामुळेच खर्‍या अर्थाने प्रभाग स्वच्छ व सुंदर झाला. यामुळेच घरातील कचर्‍यापासून तयार झालेल्या खताचे वाण लुटण्याची संकल्पना अजित पाटील यांनी राबवली. कव्हेकर परिवार व पतंजलींच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र विद्यालयात मकर सक्रांती स्नेहमेळावा घेऊन हे वाण लुटण्यात आले. महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा स्नेहमेळावा संपन्न झाला.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जि.प.च्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभाग 18 चे नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर, सौ.चंदन भूतडा, पतंजलीचे निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ.येरोळकर, प्राचार्य गोविंद शिंदे, संजय बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी स्वच्छतेचा संदेश देवून पर्यावरण सरंक्षणासाठी 5 हजार कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. या कापडी पिशव्यांमुळे पर्यावरण सरंक्षण होणार असून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षसंगोपनाचा संदेशही देण्यात आला. प्रारंभी राजमाता जिजाऊ माँ साहेबाच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर हळदी-कुंकु व संक्रांतीचे वाण लुटण्याचा पारंपारिक कार्यक्रमही संपन्न झाला. यावेळी बोलताना माजी जि.प.अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर म्हणाल्या की, मकर संक्रात हा सामाजिक सद्भावनेचा सण असून हळदी-कुंकु कार्यक्रमातून मांगल्य व सद्भावना प्रदर्शित होते. या सणानिमित्त महिलांनी आरोग्य संवर्धन व सद्भावनेचा नवा संकल्प करून राष्ट्रविकासात सहभागी व्हावे, असा संदेशही त्यांनी दिला.

याप्रसंगी बोलताना प्रभाग 18 चे नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर म्हणाले की, प्रभाग 18 हा संपुर्ण स्वच्छतेकडे वाटचाल करीत असून प्रभागात विकासाच्या नवनव्या संकल्पना राबवण्यावर भर देण्यात येत आहे. प्रभागात स्वच्छतेसाठी कचरा वर्गीकरण, सेंद्रिय खत प्रकल्प, जलवाहिनी, पथदिवे, याबरोबर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्यात येत आहे.सुशोभिकरण महत्त्वपुर्ण घटक मानून प्रखर राष्ट्रभक्ती, सक्षम राष्ट्रबांधणीसाठी विद्यार्थ्यांसह वार्डातील सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण वचनबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षीही आपण 5 हजार कापडी पिशव्यांचे वितरण करीत असून प्रत्येकाने कापडी पिशवीचाच वापर करावा व प्रभागाच्या स्वच्छतेत आणि विकासात आपले योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या