हस्तकला

>>पूजा तावरे<<

फॅशन डिझायनर

हाताने विणलेल्या वस्त्राचे सौंदर्य काही वेगळेच असते. केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर कोणत्याही ऋतूत हातमागची वस्त्रं खुलतात.

वस्त्रकला ही पूर्वापार हिंदुस्थानची जगातील ओळख. आपल्या वस्त्रांमधील विविधता आणि कापडाचा दर्जा अवघ्या जगाला आश्चर्यचकित करणारी ही कला. त्यातही हातमाग म्हणजे हातपाय वापरून चालविता येणारा माग आहे. ‘माग’ हे वस्त्र विणण्यासाठी वापरण्यात येणारे एक यंत्र आहे. सुताचे उभे धागे ताणात ठेवून आडव्या धाग्यांनी विणणे हे याचे काम आहे. मागाच्या आकारात, आकारमानात व यांत्रिकीत भौगोलिक क्षेत्रानुसार काही बदल असतात. फॅशनच्या दुनियेत कलेची जाण, कलेचं अंग असावं लागतं. मात्र क्रिएटिव्हिटी असते ती योग्य त्या फॅब्रिकच्या निवडीतून. सध्या नवी पिढी जुन्या कला, पेंटिंग, विणकाम यांना पसंती देताना दिसत आहेत. सध्या विविध फॅशन वीकमध्येदेखील हातमागाचे कपडे घातलेल्या मॉडेल्स रॅम्पवर पाहायला मिळतात.

‘फॅशन रिपीट इटसेल्फ’ म्हणजेच थोड्या फार बदलाने पुन्हा जुनीच फॅशन येत असते, असे म्हटले जाते. कपडय़ांच्या बाबतीत हे निश्चितच आहे. जुन्या काळात हातमागावर तयार करण्यात येणाऱया प्रसिद्ध कॉटन आणि खादीला मध्यंतरी फारसा प्रतिसाद मिळत नव्हता; पण सध्या कपडय़ांच्या प्रत्येक प्रकारात खादी व कॉटनचा बोलबाला आहे.

हल्ली सण उत्सवाबरोबरच लग्न सोहळ्यांमध्ये पारंपरिक लूकला महत्त्व दिले जाते. अगदी महाविद्यालयांमध्येही यंगस्टर्समध्ये खादी लोकप्रिय झाली आहे. जीन्सवर खुलून दिसणारे खादीचे कुर्ते कॉलेजच्या कार्यक्रमांमध्ये मोठय़ा प्रमाणावर दिसून येतात.

सध्याच्या फॅशन युगात हातमागावरील तयार केलेल्या साडय़ांना अधिक पसंती मिळत आहे. सल्क, बालुचारी साडी, काथा सिल्क, संबलपुरी साडी यांना अधिक मागणी दिसून येत आहे. यामुळे हातमागावरच्या साड्या हल्ली हल्ली फॅशन स्टेटमेंट ठरू लागल्या आहेत. अनेकजण लग्नसराई किंवा इतर कार्यक्रमांसाठी साडय़ा वापरताना दिसून येत आहे.

पैठणी, कांजीवरम, पटोला, जरदोसी, लेहरीया, बांधणी या कापडापासून बनवलेले कुर्ते, स्कर्ट, जॅकेट अशी मस्त फॅशन सध्या ट्रेंडमध्ये आली आहे. हॅण्डलूमच्या कपडय़ांना खास पसंती मिळतेय. हातमागावर बनवलेले कपडे सध्या ट्रेंडमध्ये असल्यामुळे खादीचे कुर्ते,पायजमा यांचा मस्त कॉम्बो घेण्याचा पर्याय वापरताना दिसून येत आहे. जीन्सवर खुलून दिसणारे खादीचे कुर्ते कॉलेजच्या कार्यक्रमांमध्ये मोठय़ा प्रमाणावर दिसून येतात.

 

 

बॉलीवूडमय हॅण्डमेड फॅशन

गेल्या काही काळात या सिनेफॅशनमध्येही आवर्जून हिंदुस्थानीय पारंपरिक कशिदाकाम आणि टेक्स्टाइल अशा हातमागाच्या कपडय़ांवर प्रयोग होताना दिसत आहेत. ‘खूबसुरत’मध्ये सोनम कपूरने ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ म्हणत पार्टीमध्ये घातलेली कॉटनची बॉर्डर असलेली धोती पॅन्ट, ‘तम्मा तम्मा’ या गाण्यातील आलिया भट्टचे फुलकारी जॅकेट, ‘हम्मा हम्मा’ साँगमध्ये श्रद्धा कपूरने जयपुरी मिरर वर्क असलेली शॉर्ट्स आणि आदित्य रॉय कपूरने बांधणीचा शर्ट, धितिंग नाचमध्ये शाहिद कपूरने घातलेल्या हातमागावरच्या कापडाचं डिझाईन जॅकेट लोकप्रिय झालंय. कंगना रनोट हिने ‘राणी लक्ष्मीबाई’ सिनेमात परिधान केलेली साडी, ‘इजाजत’मधल्या रेखाने परिधान केलेल्या वेगवेगळ्या रंगांच्या सुरेख नारायण पेठी साडय़ा आणि ‘रुदाली’मध्ये डिंपल कपाडियाने हातमागावर तयार केलेले राजस्थानी, टिपिकल मातकट रंगांचे हॅण्डब्लॉक प्रिंटचे कपडे पाहायला मिळतात.

हातमागाचे फायदे

>कपडय़ांवर पेंटिंगमधील फुले, वेली यांचे मोटीफ वापरून ऍम्ब्रॉयडरी करून कलेक्शन सादर केले जाते.

>हातमागावर तयार होणारे कपडे नैसर्गिक धाग्यांपासून बनवलेले, नैसर्गिक रंग वापरलेले आणि म्हणूनच सुखदायक असतात.

>हातमागावर मुख्यतः कॉटन आणि सिल्क अशी दोन प्रकारची कापडं तयार होतात जी दिसतातही फार सुंदर.

>हातमागाचा अजून एक फायदा म्हणजे हे कपडे पर्यावरणस्नेही असतात कारण त्यामध्ये नैसर्गिक कच्चा मालच वापरलेला असतो.

>खास उन्हाळ्यात बरामा विणकाम केलेला मेखला कुर्ता, बांधणी कुर्ता, सुती स्कर्ट, डाबका अजराख कुर्ता, ओरिसातील ब्लेंडेड डाय केलेली पाश्चिमात्य धाटणीची वस्त्र, सण-मुहूर्तांसाठी चंदेरी सिल्क तसेच कळमकरी, मंगलगिरी, इकत, डोंगरिया, माहेश्वरी, फुलिया साडय़ा दुपट्टा विशेष उत्पादने उपलब्ध आहेत.