सलाम वालैकुम! ऐकताच जवानांचा त्वेषाने हल्ला

3766
border-soldier

‘हॅलो कर्नल शर्मा….’ कर्नल शर्मा यांचा फोन तर लागला होता पण समोरून आवाज आला ‘सलाम वालैकुम’. ते ऐकताच काहीतरी गडबड असल्याचे निश्चित झाले आणि लष्कराच्या जवानांनी त्या घरावर त्वेषाने हल्ला चढवला. 12 तास चकमक झाली, दहशतवादी मारले गेले पण कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह मेजर अनूप सूद, नायक राजेश कुमार, लान्स नायक दिनेश सिंह आणि जम्मू-काश्मीरचे पोलीस उपनिरीक्षक सागर पठाण हे शहीद झाले. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे झालेल्या चकमकीबद्दल एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

हंदवाडातील एका घरामध्ये लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी लपले होते. त्यांनी तेथील कुटुंबाला ओलीस ठेवले होते. कर्नल शर्मा आणि टीमने घरात घुसून त्या कुटुंबाची सुटका करण्यात यश मिळवले होते. पण त्यानंतर बराच वेळ आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. काही वेळानंतर बाहेरील जवानांनी कर्नल शर्मा यांच्या मोबाईलवर संपर्क साधून परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण तो मोबाईल एका दहशतवाद्याच्या हातात होता. समोरून सलाम वालैकुम असे उत्तर मिळाले. कर्नल शर्मा आणि आत घुसलेले इतर जण दहशतवाद्यांच्या हाती सापडले होते. त्यानंतर पुन्हा गोळीबार सुरू झाला आणि सुरक्षा जवानांनी धाडसी कारवाई करत त्या घरामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा केला.

युद्धासाठी वापरण्यात येणाऱ्या रायफली सापडल्या
चकमकीनंतर सुरक्षा जवान आत घुसले तेव्हा तिथे त्यांना जे दिसले ते पाहून धक्काच बसला. युद्धासाठी ज्या पद्धतीने शस्त्रास्त्रांचा वापर केला जातो तशी शस्त्रास्त्रे तिथे सापडली. त्यात चिनी बनावटीच्या टाईप 56 रायफली, रोमानियन बनावटीच्या डब्ल्यूएएसआर रायफल यांचा समावेश होता. अशा प्रकारच्या रायफली या विशेषता युद्धामध्ये वापरल्या जातात.

आपली प्रतिक्रिया द्या