‘त्या’ नराधमास फाशी द्या, शिवसेना आमदाराची मागणी

21

सामना प्रतिनिधी । परभणी

शहरातील गांधी पार्क येथून १८ एप्रिल रोजी अपहरण करुन अल्पवयीन बालिकेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत फाशी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे केली. पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी या बलात्कार प्रकरणी सोमवारी निवेदन दिले. तसेच आरोपीचा काळकुट्ट पूर्व इतिहास पाहुन त्याच्या विरुद्धच्या कायदेशीर कारवाईत कुचराई झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा स्पष्ट इशाराही शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना दिला.

परभणी जिल्ह्यातील बालिकेवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील प्रचंड संतापले. जवळपास १०० लोकांचे शिष्टमंडळ घेऊन त्यांनी पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांची भेट घेतली. जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चालेल्या अवैध धंद्यांबद्दलही त्यांनी तीव्र शब्दात खेद व्यक्त केला. अवैध धंद्यामुळे पोलीसांचे समाजातील कायदा व सुव्यवस्थेवरील नियंत्रण सुटत चालले असून पोलीस अधीक्षकांनी स्वत: यात जातीने लक्ष घालून सात वर्षाच्या बालिकेवर अत्त्याचार करून बलात्कार करणाऱ्या बबलू सय्यद अशरफ या नराधम आरोपीविरुद्ध नवीन कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. नव्या कायद्यासंदर्भात देशाचे राष्ट्रपती यांनी नव्या अध्यादेशावर नुकतीच स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या नराधमाला नव्या कायद्यानुसार फाशी तर होणारच आहे. परंतु, ही फाशी जलतगती न्यायालयात प्रकरण चालवून तातडीने झाली पाहिजे. पोलीस अधीक्षकांनीही या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा होईल अशीच कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले.

परभणी शहरात घडलेल्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी सतर्कतेने या नराधमाला २२ एप्रिल रोजी सायंकाळी पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे जाऊन अटक केली. या नराधमाने या मुलीला परभणी शहरातून थेट पूर्णा तालुक्यातील अजदापूर येथील एका आखाड्याच्या परिसरात बलात्कार करुन तेथेच सोडून दिले. असाह्य पीडित मुलगी त्याच परिसरात शेतात फिरत असताना जवळच असलेल्या दुसऱ्या आखाड्यावरील शेतकऱ्यांना ती दिसून आली. तीचे नाव, गाव विचारले असता तीने घडलेली दुर्दैवी घटना सांगितली. त्यानंतर नराधम आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे, रामराव गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणीता बाभळे, जमादार हनुमंत जक्केवाड, शिवा धुळगुंडे, किशोर चव्हाण, अरुण कांबळे यांनी नराधम आरोपी सय्यद बबलू सय्यद अशरफ (३५) यास धानोरा काळे येथे जावून गजाआड केले.

आपली प्रतिक्रिया द्या