शक्ती… युक्ती…भक्ती…!

102

>>रवींद्र गाडगीळ

शक्ती, भक्ती, युक्ती आणि त्याग ही चारही मूल्ये मारुतीरायाच्या ठायी एकवटली आहेत. आजच्या काळातही सर्वांनाच आदर्श वाटावे असे हे दैवत!

पांडुरंगाचे निस्सिम भक्त म्हणून ओळखले जाणारे तुकाराम महाराज, प्रभू श्रीरामाच्या दासाला, अर्थात हनुमंताला उद्देशून लिहितात, ‘शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता!’ काय कारण असेल, तुकाराम महाराजांनी हनुमंताला शरण जाण्याचे? समाजाला ज्यांनी भक्तीच्या वाटा दाखवल्या, नैतिकतेचे धडे दिले, अध्यात्माची ओळख करून दिली, ज्यांनी समाज उन्नतीसाठी साडेचार हजारांहून अभंग लिहिले, ते तुकाराम महाराज हनुमंताला शरण जाऊन विचारतात, ‘काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा ह्या सुभटा’! असे नेमके तुझ्यात काय वेगळेपण होते हनुमंता, की तुझ्या हृदयी राम आणि रामाच्या हृदयी तू स्थान पटकावले होतेस? असे ते विचारतात.

रावणाशी युद्ध करून परतल्यावर सीतामाईने हनुमंताला अनमोल नवरत्नाचा हार सदिच्छा भेट म्हणून दिला आणि तो हार त्याने चक्क दाताने फोडून त्यात रामाचा शोध घेतला होता. त्याच्या अशा वागण्यावर नाराज होऊन सीतामाईने त्याच्या हृदयातला राम दाखवायला सांगितला, तेव्हा हनुमानाने हृदयसिंहासनावर विराजित झालेली रामपंचायतनाची छबी सर्वांना दाखवली. एवढेच नाही, तर हनुमंताला चिरंजीवी होण्याचे वरदान मिळाले, तेव्हाही त्याने ‘रामकथा’ असेपर्यंतच जीवित राहणार, असे वरदान मागून घेतले! त्याचे भगवद्भक्तीचे प्रेम, वेड सर्वसामान्यांनाही कळावे, म्हणून तुकाराम महाराजांनी हनुमंताकडे या गोष्टींवर मार्गदर्शन मागितले आहे.

हनुमंताच्या शक्तीला युक्तीची जोड होती. म्हणून त्याची शक्ती वेळोवेळी धर्मकार्यासाठी, संतसज्जनांच्या रक्षणासाठी वापरली गेली. त्यासंदर्भात हनुमंताचे रामायणातले अनेक दाखले आठवतात. समुद्र पार करत असताना त्याला गिळंकृत करू पाहणाऱया राक्षसिणीसमोर हनुमंत सुक्ष्म रूप धारण करतात, तर कुंभकर्णाशी युद्धात चार हात करताना महाकाय रूप धारण करतात. आपली शक्ती कुठे, कशी वापरली पाहिजे याचा वस्तुपाठ ते घालून देतात. हनुमंताचे सामर्थ्य जाणून आणि त्याची भक्ती, प्रेम पाहून अनेक मोठ्या प्रसंगात रघुरायांनी हनुमंताची मदत घेतली आहे, मत घेतले आहे, मोठी जबाबदारी सोपवली आहे. म्हणून ‘स्वामिकाजी बळीया धीर’ असे महाराजांनी म्हटले आहे.

हनुमंत बल-बुद्धी संपन्न होता. त्याला मानसशास्त्र, राजनीती, साहित्य, तत्वज्ञान इ. विषयांचे सखोल ज्ञान होते. व्यायामाचे महत्त्व जाणून हनुमंताने कमावलेले शरीर तरुणांसाठी आदर्श ठरावे, म्हणून समर्थ रामदासांनीदेखील गावोगावी हनुमंताची मंदिरे बांधली आणि त्याला लागूनच व्यायामशाळा सुरू केल्या. हनुमंत हा अकरावा रुद्रावतार! म्हणून शेवटी तुकाराम महाराज लिहितात, ‘तुका म्हणे रुद्रा, अंननिचिये सुकुमारा’! रामकार्यासाठी, रामराज्यासाठी अविरत झटणाऱ्या अंजनीच्या सुकुमाराचे गुण आम्हालाही आत्मसात करण्याची प्रेरणा लाभू देत, हीच हनुमान जयंती उत्सवाची फलश्रुती!

आपली प्रतिक्रिया द्या