हनुमान अणि लंकादहन

>>मंदा आचार्य

अखेर लंकेत सीतेचा निरोप घेऊन हनुमान परतीच्या मार्गाला लागला. त्याच्या मनात एक विचार आला, ‘अजून आपली थोडी जबाबदारी राहिली आहे, तर जाता जाता या राक्षससेनेचं बळ तरी अजमावूया’ म्हणून त्याने प्रमदवन आणि राजवाड्याचा परिसर या ठिकाणी वृक्ष-वेली, घरं यांची नासधूस करायला सुरुवात केली. मोठे मोठे पाषाण नि उपटून काढलेले वृक्ष ही त्याची हत्यारे होती. हनुमानाने घातलेल्या या धुमाकुळाने सारी जनता घाबरून सैरावैरा धावू लागली. त्यामुळे राक्षससेनेनेदेखील हनुमानाचा पाठलाग सुरू केला. ही वार्ता अर्थातच लंकाधिपती रावणापर्यंत पोचली. तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला, ‘हा मानवरूपी वानर कुणी साधारण वानर वाटत नाही. हा कुणीतरी वानराचं रूप घेऊन आलेला मनुष्यप्राणी असावा.’ त्याने त्वरित आपल्या सेनाधिकाऱ्याला हुकूम सोडला, ‘त्या वानराला पकडून त्वरित आमच्यासमोर हजर करा’. हनुमानाला नेमकं हेच हवं होतं. तो सुग्रीवाचा संदेश रावणाला देण्यासाठी त्याचा दूत म्हणून आला होता. त्याला रावणाची भेट हवीच होती.

हनुमान आणि राक्षससेना यांच्यात छोटी लढाई झाली. अनेक शूर राक्षस मृत्युमुखी पडले. सेनापतीचा पुत्र आणि रावणाचा कनिष्ठ पुत्र अक्ष यांनाही हनुमानाने ठार केलं. राक्षससेनेच्या बाणांच्या वर्षावाला हनुमानाने वृक्ष, पाषाण, तुळ्या यांच्या सहाय्याने तोंड दिलं; शेवटी रावणाचा ज्येष्ठ पुत्र इंद्रजित याला रावणाने गाठलं. त्याचाही हनुमानाने धुव्वा उडवला. तोंडाने मोठय़ा आरोळ्या ठोकत तो श्रीराम आणि लक्ष्मण यांचा जयघोष करीत होता.

रावण या साऱ्या प्रकाराने क्रोधित झाला होता. हनुमानाला त्याच्या सैनिकांनी पकडून आणल्यानंतर हनुमानाला ठार करण्याची आज्ञा रावणाने आपल्या सैनिकांना दिली. तत्पूर्वी त्याने आपला प्रधानमंत्री प्रहस्त याला पकडलेल्या वानराची चौकशी करण्यास सांगितलं. तेव्हा प्रहस्ताने विचारलं,  ‘हे वानरश्रेष्ठा, तू कोण, कुठून आलास व तुझ्या इथे येण्याचं कारण काय? तू सत्य तेच सांग. असत्य सांगशील तर तुला जीवन दुर्लभ आहे’. हनुमान धीटपणे उत्तरला, ‘वैश्ववणाचा नातू, मी वायुपुत्र हनुमान आहे. प्रभू श्रीरामाचा दूत म्हणून मी इथे संदेश घेऊन आलो आहे.’ यानंतर हनुमानाने श्रीराम वनात आल्यापासूनची सर्व हकीगत सांगितली; श्रीरामाची थोरवी गायिली. ‘सीतेला आपण परत करावे, नाही तर राम आणि लक्ष्मण अफाट वानरसेना बरोबर घेऊन येथे येतील.’ हनुमानाचे हे उद्गार ऐकून रावणाचे शरीर संतापाने थरथर कापू लागलं. त्याने त्वरित ‘हनुमानाचा वध करा’ असा आदेश दिला. परंतु रावणाचा भाऊ बिभीषण याने रावणाला थांबवलं. ‘नैतिक व राजकीयदृष्ट्या तू हनुमानाचा वध करू शकत नाहीस, कारण तो श्रीरामाचा दूत आहे. तो त्याचं कर्तव्य करीत आहे. त्याला तू शिक्षा दे आणि तुझे खरे शत्रू राम आणि लक्ष्मण यांना कैद करून आणायला सांग.’ रावणाला ते पटलं. त्याने वानरांचा प्राण त्यांच्या शेपटीत असतो हे आठवून सैनिकांना आज्ञा केली ‘याच्या शेपटीला चिंध्या बांधा आणि आग लावून द्या’. सैनिकांनी आज्ञापालन केलं.

हनुमानाची शेपटी जळू लागली तेव्हा तो मनाशी म्हणाला, ‘याने केवळ मला शारीरिक वेदना होतील, पण माझं मन रामभक्तीने भरलेलं आहे, त्याला काहीच इजा होणार नाही. उलट या जळक्या शेपटीने लंकानगरीचं आणखी नुकसान करण्याची संधी मला मिळाली.’ त्यानुसार त्याने राजवाड्याच्या परिसरातील मोठी मोठी भव्य रत्नजडित, सुवर्णजडित अशी दालनं, हिरेमोतीजडित अनेक आसनं इत्यादी उद्ध्वस्त करीत सबंध राजवाडा जाळून टाकायला सुरुवात केली. पशू, पक्षी, स्त्रिया यांना वगळून त्याने अन्य सर्वांचा पूर्ण सत्यानाश करून टाकला. शेवटी सर्व इमारती, भुवनं भस्मसात केली. राक्षससैन्य त्याचा पाठलाग करीत होतं. सर्वत्र हाहाकार माजला-जेव्हा हनुमानाने हळुवारपणे राजवाड्याचं मुख्य प्रवेशद्वार गाठलं, तेव्हा त्याची शेपटी सूर्याची आग ओकीत होती. नंतर समुद्रात जाऊन हनुमानाने त्याच्या शेपटीची ती प्रचंड आग विझविली. शत्रूला धाक निर्माण करण्यासाठी स्वामीनिष्ठ हनुमानाने एवढी जोखीम उचलली. धन्य तो स्वामीभक्त व धन्य त्याचा तो स्वामी!

आपली प्रतिक्रिया द्या