#HappyBirthday ‘जंबो’, इंजिनिअरिंग सोडून क्रिकेटपटू बनला अन इतिहास रचला

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याचा आज वाढदिवस. ‘जंबो’ नावाने परिचित असणाऱ्या अनिल कुंबळे याचा जन्म 17 ऑक्टोबर, 1970 ला कर्नाटकमधील बंगळुरू येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव कृष्णा स्वामी आणि आईचे नाव सरोजा आहे. लहानपणीपासून अभ्यासात हुशार असणाऱ्या कुंबळेने 1992 ला नॅशनल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. सोबत क्रिकेट खेळण्याची आवडही जोपासली.

अनिल कुंबळेने 1989 ला कर्नाटक विरुद्ध हैद्राबाद लढतीद्वारे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केला. पहिल्याच लढतीत 4 बळी घेणाऱ्या कुंबळेची पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी अंडर-19 संघात निवड झाली. यानंतर 1990 ला त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना खेळला. याच वर्षी त्याने कसोटी क्रिकेटमध्येही पदार्पण केले आणि इंग्लंड विरुद्ध पहिला सामना खेळला. इंग्लंडचा खेळाडू एलेन लैंब हा कुंबळेचा कसोटीतील पहिला बळी ठरला.

पाकिस्तानविरुद्ध 10 बळींचा विक्रम

images-1
अनिल कुंबळे याच्या नावावर एका अश्या विक्रमाची नोंद आहे जो सहजासहजी तोडणे शक्य नाही. कुंबळेने कसोटीत एकाच डावात विरोधी संघाचे सर्वच्या सर्व 10 खेळाडूंना बाद केले. 1999 ला फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या कसोटीत कुंबळेने पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात 10 खेळाडू बाद केले होते. कुंबळेआधी असा विक्रम इंग्लंडचे खेळाडू जिम लेकर यांनी केला होता.

जबड्याला पट्टी बांधून खेळला

images-2
वेस्ट इंडिजमध्ये 2002 ला खेळल्या गेलेल्या अँटीगुआ कसोटीला विसरणे अशक्य आहे. या लढतीत जबड्याला चेंडू लागल्याने कुंबळे रक्तबंबाळ झाला. मात्र चेहऱ्याला पट्टी बांधून त्याने सलग 14 षटक गोलंदाजी केली आणि ब्रायन लारा याचा बळी घेत सामना अनिर्णित राखण्यास मोलाचे योगदान दिले.

कारकिर्दीवर एक नजर
– कुंबळेने आपल्या कारकीर्दीमध्ये एकूण 132 कसोटी सामने खेळले. यात त्याने 619 बळी मिळवले. तसेच एकाच डावात 10 विकेट घेण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला.

– कुंबळेने 1999 मध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात पाकिस्तानविरुद्ध 74 धावात 10 बळी घेतले होते.

– एकाच डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी मिळवण्याची कामगिरी कुंबळेने तब्बल 35 वेळा केली, तर संपूर्ण सामन्यात 10 बळी घेण्याची कामगिरी 8 वेळा केली.

– कसोटीसह एक दिवसीय सामन्यात कुंबळेने 271 सामन्यात 337 बळी घेतले. 12 धावा 6 फलंदाज बाद हे त्याचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे.

– कुंबळे याने टीम इंडियाचे कर्णधारपद आणि प्रशिक्षकपदही भूषवले आहे. सध्या तो आयपीएलमध्ये (आयपीएल 2020) किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा प्रशिक्षक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या