#HappyBirthdayGanguly ‘बंगालचा टायगर’ झाला 48 वर्षाचा, जाणून घ्या खास माहिती

टीम इंडियाला विजयाची गोडी लावणारा, हिंदुस्थानात नाहीतर विदेशातही आम्ही जिंकू शकतो हा आत्मविश्वास देणारा, ‘प्रिंस ऑफ कोलकाता’ आणि ‘बंगालचा टायगर’ नावाने प्रसिद्ध असणारा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा आज 48 वा वाढदिवस आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर शर्ट काढून नाचणारा ते टीम इंडियाला एस.एस.धोनी देणाऱ्या सौरव गांगुलीचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. जाणून घेऊया त्याच्याबाबत काही खास माहिती…

1. सौरव गांगुली डावखुरा फलंदाज आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु त्याआधी तो उजव्या हाताने सर्व काम करायचा. परंतु भाऊ स्नेहाशीष डावखुरा होता व त्याच्यासोबत क्रिकेट खेळताना अडचण येत असल्याने गांगुली डाव्या हाताने फलंदाजी करू लागला. परंतु गोलंदाजी मात्र उजव्या हाताने करायचा.

2. क्रिकेटआधी सौरव गांगुलीचे पहिले प्रेम फुटबॉल हा खेळ आहे. परंतु त्याच्या भावाने त्याला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा दिली. विशेष म्हणजे रणजी ट्रॉफीसाठी बंगालच्या संघात गांगुलीची निवड त्याचा भाऊ स्नेहाशीषच्या जागी झाली होती.

3. सौरव गांगुली डेव्हीड गावर, डेव्हीड बून, मोहिंदर अमरनाथ, कपिल देव आणि अॅलेन बॉर्डर या खेळाडूंना आदर्श मानतो. तर बीडी देसाई, व्हीएस पाटील आणि हेमू अधिकारी हे प्रशिक्षक त्याच्या विशेष आवडीचे आहेत.

ganguly-sourav

4. सौरव गांगुली आणि त्याची पत्नी डोना यांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटासारखीच आहे. डोना व्यवसायिक ओदिशी डान्सर होती आणि ती गांगुलीच्या शेजारीच राहायची. शाळेच्या दिवसातच दोघांना एकमेकांप्रती प्रेमभावना निर्माण झाली.

6. डोनाला पाहण्यासाठी सौरव तिच्या घराजवळ सायकल फिरवत बसायचा. परंतु दोन्ही कुटुंबांमध्ये वाद होता. दोघांनीही कुटुंबीयांना माहिती न देता 12 ऑगस्ट, 1996 ला लग्न केले. तोपर्यंत गांगुली क्रिकेटमध्ये चांगलाच प्रसिद्ध झाला होता.

7. गांगुलीचे कुटुंबीय त्याचे लग्न एका ब्राह्मण मुलीशी करू इच्छित होते. लग्नानंतर जवळपास सहा महिने कुटुंबीयांनी त्यांना स्वीकारले नाही. अखेर 21 फेब्रुवारी, 1997 ला एका छोट्या समारंभाचे आयोजन करण्यात आले आणि हाच दिवस ते लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करू लागले.

sourav-dona-ganguly

8. पश्चिम बंगालच्या प्रेक्षकांनी दादावर मनापासून प्रेम केले. पश्चिम बंगालमध्ये उत्तरी 24 परगना जिल्ह्यात सौरवचे नाव एका रस्त्याला देण्यात आले आहे.

9. गांगुली टीम इंडियाकडून 113 कसोटी खेळला आणि यात त्याने 7212 धावा केल्या आहेत, तर 311 एक दिवसीय लढतीत 22 शतकांसह 11363 धावा केल्या आहेत.

10. 1996 ला इंग्लंडविरुद्ध लॉर्डसवर पदार्पणाच्या कसोटीत 131 धावांची खेळी सौरवने केली आणि पहिल्याच लढतीत शतक ठोकणारा तिसरा खेळाडू बनला.

11. 2002 ला नेटवेस्ट सिरीजच्या फायनलमध्ये विजय मिळवल्यावर गांगुलीने लॉर्ड्सवर शर्ट काढून सेलिब्रेशन केले होते. त्यावेळी त्याच्यावर टिकाही झालेली.

12. दादाच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 49 कसोटीत 21 विजय मिळवले, 13 लढतीत पराभव पाहिला. तसेच 146 एक दिवसीय लढतीत 76 विजय आणि 65 लढतीत पराभव पाहिला.

sourav-ganguly-lords

आपली प्रतिक्रिया द्या