HappyBirthday – हिंदुस्थानचा पहिला ‘शतकवीर’ ते ब्रॅडमनची ऐतिहासिक विकेट

1034

कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. त्यात जर तुम्ही पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारे आणि देशाकडूनही पहिला ‘शतकवीर’ होण्याचा मान पटकावणारे खेळाडू असेल तर तो रोमांचक क्षण असतो. आज अशाच एका शतकवीर खेळाडूची 108 वी जयंती आहे, ज्याने हिंदुस्थानकडून कसोटीतील पहिला ‘शतकवीर’ होण्याचा मान पटकावला. हा पराक्रम करणाऱ्या खेळाडूचे नाव आहे लाला अमरनाथ.

Photo : कसोटी खेळणाऱ्या संघांचे पहिले ‘शतकवीर’ माहीत आहे का?

लाला अमरनाथ यांचा जन्म 11 ऑगस्ट, 1911 ला पंजाबमधील कपूरथला येथे झाला. वयाच्या 22 व्या वर्षी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावले. 17 डिसेंबर, 1933 ला इंग्लंडविरुद्ध खेळताना लाला अमरनाथ यांनी मुंबईतील जिमखाना मैदानावर 118 धावांची शतकी खेळी केली. लाला अमरनाथ यांचे ते कसोटीतील पहिले आणि शेवटचे शतक ठरले. परंतु हिंदुस्थानकडून पहिले शतक झळकावण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा झाला.

पहिल्या शतकासह लाला अमरनाथ यांच्या नावावर आणखी एक खास विक्रम आहे.  क्रिकेटमधील बादशहा सर डॉन ब्रॅडमन यांना बाद करण्याचा बहुमान त्यांनी पटकावला आहे. हिंदुस्थानकडून दत्तू फडकर आणि लाला अमरनाथ या दोन गोलंदाजांना ब्रॅडमन यांची विकेट मिळाली आहे.

लाला अमरनाथ यांनी आपल्या छोट्याशा कारकीर्दीमध्ये 24 कसोटी खेळल्या. यात एका शतकासह 878 धावा केल्या आणि 45 विकेट्सही मिळवले. त्यांच्या नेतृत्वाखाली खेळताना हिंदुस्थानने 1952-53 मधील पहिल्या अधिकृत पाकिस्तान दौऱ्यात विजय मिळवला होता. 19 वर्षाच्या कारकीर्द राहिलेल्या लाला अमरनाथ यांचा 5 ऑगस्ट, 2000 ला वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले.

आपली प्रतिक्रिया द्या