हॅप्पी हॉलिडेज!

169

>> द्वारकानाथ संझगिरी

खूप खूप वर्षांनी जुन्या वर्षाची नशिली रात्र आणि नव्या वर्षाची पहाट मी देशाबाहेर अनुभवली आणि तीही कुटुंबीयांबरोबर. मुलगा, सून, बायको आणि नात! तसं २५ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया मनाने रजेवर आणि हॉलिडे मूडमध्ये होतं. काही प्रत्यक्षात रजेवर होते. ‘नशिबवान’ या शब्दाची व्याख्या आपल्यापासून सुरू झाली असा भाव त्यांच्या चेहऱयावर होता. ज्यांना नोकरीवर जावं लागलं त्यांच्या चेहऱ्यावर, मुलायमसिंगच्या चेहऱ्यावर ‘आपल्याच पोटी असा मुलगा का यावा?’ असं प्रश्नचिन्ह दिसतं. तसं प्रश्नचिन्ह होतं की फक्त प्रश्न होता, ‘आपल्याच नशिबी हा भोग का?’

ख्रिसमस ते नवं वर्ष या काळात मुंबईप्रमाणे ऍडलेड ‘बदन पे सितारे लपेटे हुए’टाइप रोषणाईने नटलेलं नव्हतं. तरी सेंट पिटर्समधल्या अव्हेन्यू नाइनवरचे ४०-५० बंगले, रंगीबेरंगी दिव्यांचे अलंकार असे मिरवत होते की, ती ख्रिसमस रोषणाईची फॅशन परेड वाटत होती. नाताळाच्या कथेशी निगडित सर्व गोष्टी तिथे होत्या. स्वर्गातून येणाऱया एंजल्स, चरणारी गुरं, रेनडियरच्या गाडीतून येणारा सॅन्टा, ती चमकणारी चांदणी वगैरे! काही ठिकाणी रोषणाई बंगल्याच्या बाहेरही होती. बंगला बंद होता. पण कुणी हात लावणं, खराब करणं, पळवणं असले उद्योग नाहीत. ‘आपण आतापर्यंत पाहिलेलं हे सर्वोत्कृष्ट’ असं वाटत असताना पुढचा बंगला, त्यातल्या रोषणाईचे रंग आणि मांडणी डोळे असे दिपवून टाकायची की मागचं विसरलं जायचं. या ऍव्हेन्यू नाइनची परंपरा ही कित्येक वर्षाची आहे. प्रत्येक बंगल्याचा मालक स्वखर्चाने रोषणाई करतो. अर्थात ही सर्व ‘कुबेर’ आडनावाची माणसं आहेत हे सांगावं लागत नाही. कुणीतरी सांगितलं की ऍडलेडपासून ३०-४० कि.मी.वर डोंगराच्या कुशीत ‘लॉबेथॉल’ म्हणून गाव आहे. तिथेही डोळय़ांच्या म्युझियममध्ये जपून ठेवावी अशी रोषणाई असते म्हणून आम्ही गेलो.

गाव सुंदरच होतं. तसं इथं गाव हे देखावे पेंट केलेलं निसर्गचित्रच वाटतं. देवाने एक सुंदर निसर्गचित्र निर्माण केलं आणि ऍडलेडजवळच्या डोंगरावर एक खुंटी ठोकून ते चित्र लटकवलं. त्याला मग लॉबेथॉल नाव पडलं. तिथल्या मंडळीने ठरवलं की देवाच्या वाढदिवसाच्या काळात त्याच्याच चित्रात आधुनिक रंग भरून देवालाही स्तीमित करावं की त्याने निर्माण केलेला माणूस अगदीच निकम्मा नाही. तोही देवाचं पेंटिंग अधिक सुंदर करू शकतो. गेली ४०-४५ वर्षे तिथे गाव आणि गावातली घरे नाताळात नटतात. यावेळीही नटली. पण वादळ आलं आणि पडझड झाली.

आम्ही गेलो तेव्हा फक्त २४ टक्केच रोषणाई तिथे उरली होती. पण मला भावली ती संस्कृती! गणपती-नवरात्रीत आपल्याकडे देखावे उभे राहतात ते अशाच संस्कृतीचा भाग आहे. कावळा पूर्वी जसं घरटं बांधायचा तसंच आजही बांधतो. वाघ-सिंह अजून रानातच फिरतात. पण बदलला फक्त माणूस. तो गुहेतून, रानातून एका वेगळय़ा जगात आला. यांना विज्ञानाएवढी संस्कृती जबाबदार! विज्ञान सुखाचा मार्ग दाखवते. संस्कृती आयुष्य सुखी आणि जगण्यालायक करते. म्हणून संस्कृतीतला चांगला भाग टिकलाच पाहिजे. माझ्या लहानपणी दादरच्या हिंदू कॉलनीत दिवाळीत विविध इमारतींत ‘किल्ले’ उभारले जात. त्याला बक्षिसं असत. माझा मावसभाऊ चंदू घुमे कितीतरी बक्षिसं मिळवत असे. आज ती तिथली संस्कृती संपली. कदाचित आजच्या पिढीकडे तेवढा वेळ नाही. एक चांगला संस्कार लोपला असं मला वाटतं. ऍडलेडच्या लॉबेथॉल, ऍव्हेन्यू नाइनकडून हा संस्कार टिकवायची प्रेरणा घ्यायला हवी.

लॉबेथॉलहून जवळच एक ‘हॅनडॉर्फ’ नावाचं जर्मन गाव आहे. असंच देवाचं एक पेंटिंग! ब्रह्मदेवाने आपल्या दिवाणखान्याच्या भिंतीवरून काढलं. त्यात प्राण फुंकले आणि दक्षिण ऑस्ट्रेलियाला बहाल केलं. प्रशियामध्ये जर्मन इमिग्रन्टस धार्मिक अत्याचाराला घाबरून पळाले. झेब्रा नावाच्या बोटीने इथे ऑस्ट्रेलियात आले. हे गाव उभारले आणि गावाला त्यांना वाचवणाऱया बोटीच्या कॅप्टनचं, कॅप्टन ‘हान’चं नाव दिलं. म्हणून गाव हॅनडॉर्फ! घर जर्मन, माणसं जर्मन, खाणं जर्मन, विकला जाणारा माल बऱयापैकी जर्मन! मुख्य रस्त्यावरून चालणं हा कलात्मक आणि सांस्कृतिक अनुभव आहे.

मुंबईतील पारसी कॉलनीतल्या झाडाप्रमाणे, १०० वर्षे जुनी झाडं तिथं तुमच्यासाठी हिरवं छत बनून उभी आहेत. गेल्या वेळी आम्ही इथे स्ट्रॉबेरी पिकिंगला आलो होतो. यावेळी माझ्या मुलाला, त्याचं मन जडलेलं जर्मन कुक्कू घडय़ाळ हवं होतं. तेसुद्धा लंबकाचं बॅटरीचं नाही. संपूर्ण जर्मन बनावटीचं सुंदर घडय़ाळ. मी त्याला प्रश्न विचारला, ‘मेन्टेनन्सचं काय?’ तो म्हणाला, ‘जर्मन टेक्नॉलॉजी आहे. तयार झालं की आयुष्यासाठी बनतं.’ त्याच्या चेहऱयावर जर्मनीचा तांत्रिक क्षमतेचा अभिमान दिसत होता. खरंय, एखादी गोष्ट आयुष्यासाठी घ्यायचीय तर जर्मन घ्यावी. फॅशन बदलल्याप्रमाणे बदलायचीय तर चिनी आहेतच की! मला त्या जर्मन माणसाचा स्वतःच्या तांत्रिक क्षमतेतला अभिमान जो चेहऱयावर दिसला तो अतिशय भावला. आपण असा तांत्रिक माज कधी दाखवणार? जर्मन कवी गटे शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला असं म्हणतात. आपल्याला ते अभिमानास्पद आहे. पण ज्या दिवशी मर्सिडीजचा सर्वेसर्वा हिंदुस्थानी गाडीचं मॅन्युअल डोक्यावर घेऊन नाचेल तेव्हा वाटणारा गर्वसुद्धा मी दागिना समजेन.

हॅन्डहोर्फहून थर्टी फर्स्टच्या रात्री आम्ही सर्व विनोद वर्तककडे लिट्ल् मेक्सिकोत जेवायला गेलो. तो माझा फेसबुक मित्र. आम्ही प्रथमच भेटलो. तो प्रचंड छाप टाकून गेला. मराठी माणसाच्या आळशीपणाचे किती किस्से मी ऐकले असतील. पण परदेशात मराठी माणूस स्वतःला कामात झोकून देतो. हिंदुस्थानात तो शेफ होता. ऍडलेडमध्ये येऊन त्याला चारच वर्षे झाली. पण तो आणि बायको नोकरी करून संध्याकाळी हॉटेल चालवतात. तेही मेक्सिकन खाण्याला वाहिलेलं! अगदी कोलाही मेक्सिकन होता. त्याला वेगळीच चव होती. बीयर आणि वाईन ऑस्ट्रेलियन होती. तेसुद्धा मी मार्गारिटा, सॅग्रिया ही मेक्सिकन ड्रिंक्स, नंतर कधीतरी घेऊ म्हटलं म्हणून! पण काय जेवण होतं! टकिला कोळंब्या, पोटॅटोस्कीन (बटाटा सुंदर लागतो हे जाणवलं. बिनडोक माणसाला बटाटा म्हणणं सोडून दिलं) अलाजिनो पॉपर्स (मेक्सिकन मिरचीची भजी) आणि एनचिलाडा चिकन तर इतकी मस्त होती की शक्य असतं तर माणसासाठी धारातीर्थी पडणाऱया समस्त कोंबडय़ांनी मृत्युपत्रात लिहिलं असतं, ‘आमचा देह मालवणी किंवा मेक्सिकन खाद्यपदार्थात एकरूप व्हावा.’ प्रेमानं वाढलेलं जेवण अधिक चांगलं लागतं. याचा प्रत्ययही आला.

त्या रात्री तिथून थेट सिटी सेंटरमध्ये आम्ही हॉरेन्स नदीच्या काठी गेलो. दीड लाखाचा जमाव होता. लोक संगीताच्या तालावर नाचत नव्या वर्षाची वाट पाहत होते. काही मंडळी आजूबाजूच्या पबमध्ये यकृताची वार्षिक परीक्षा घेत होते. प्रेमातली जोडपी अशी विळखा घालून होती की सापानेही कुतूहलाने पहावे. प्रचंड गर्दीत नातीला मी हळूहळू गॅलरीच्या रेलिंगच्या जवळ घेऊन गेलो. हिंदुस्थानी स्ट्रीट स्मार्टनेसच्या अनुभवाचा फायदा उठवत माझ्या चंचूप्रवेशाचा मुसळप्रवेश करण्याच्या प्रयत्नात असताना एका गोऱया बाईने मला सभ्यपणे सांगितले, ‘नातीला घुसवलयस ठीक आहे. पण तिचं बोट धरून तू नको जाऊस.’ साले गोरे हुशार हं! उगाच नाही राज्य केलं आपल्यावर! रात्री १२ वाजता आकाश फटाक्यांच्या रंगीबेरंगी फुलांनी भरलं. लाल, पांढरे, हिरवे, अगदी नारिंगी आणि भगवी फुलंही होती. (ऍडलेड काऊन्सिलमध्ये कुणी शिवसैनिक निवडून आलाय का?) १५ मिनिटे डोळय़ांची पापणी बंद होणं रोखता येईल का? असा विचार करीत डोळय़ाने तो नजारा घटाघटा पीत होतो. फटाके संपल्यावर नात इंग्लिशमध्ये मला म्हणाली, ‘हे सर्व संपूच नये असं वाटत होतं.’ आता या वयात वर्षच संपू नये असं वाटतं. असो, नव्या वर्षाच्या शुभेच्छा!
>>  [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या