आनंदयात्री

>> हेमांगी नेरकर

आपल्याच माणसांनी थोडेसे एकमेकांना समजून घेण्याचा समंजसपणा दाखवला तर बऱयाच गोष्टी सोप्या होतात.
प्रत्यक्ष जन्मदात्रीबरोबर भांडून निघाले होते. ‘पुन्हा तुझा उंबरठा ओलांडणार नाही’ असं ठणकावून तडक घर सोडलं होतं. पावलं भरभर सरकत होती. डोकं भणभणत होतं. कधी स्टेशन गाठलं कळलंच नाही. मनाला एकच गोष्ट सतावीत होती. मी रागानं निघाले… आईनं जाऊ दिलं. एका शब्दानं `माघारी फीर’ म्हणाली नाही. असो.

कुठल्याशा स्टेशनवर गाडी थांबली. काही प्रवासी उतरले. काही प्रवासी चढले. जागा त्याच. चेहरे बदललेले. कथासंग्रहातलं नवीन पान उलगडल्यासारखं वाटलं. आता माझ्यासमोर एक तरुण नवविवाहित जोडपं आणि त्यांच्या सोबत काका, मामा शोभावेत असे वयस्कर सद्गृहस्थ असा परिवार बसला होता. माझ्या नकळत मी त्यांच्या गप्पा ऐकत होते.
त्या कोवळय़ा जोडप्याची करुण कहाणी सुरू झाली होती. ते दोघं कोर्ट मॅरेज करून घरच्यांच्या परवानगीविना घरातून पळाले होते. आपल्या मागावर कोणी आलं तर आपलं काय होईल, ही भीती त्यांना भंडावीत होती. त्यांच्या गप्पा ऐकून माझा थरकाप उडाला होता. त्या दोघांनी ठरवलं होतं की, पुढे काहीतरी भयानक होण्यापेक्षा आपल्याला एकत्र जगता येणार नसेल तर आपण एकत्र मरावं. आपलं जगणं कोणीही हिसकावू शकेल, पण आपलं मरण तर आपलंच असेल ना? हा विचार त्या दोघांचा अगदी पक्का झाला होता. त्यांच्यासोबत असलेले सद्गृहस्थ त्यांचे कोणीही लागत नव्हते. ते त्यांचे शेजारी होते. केवळ या मुलांनी चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून स्वत:च्या गावी त्यांची तात्पुरती सोय करण्याकरिता चालले होते. मला त्या काकांबद्दल आदर वाटला.

अचानक झुकझुकचा ठेका चुकला होता. ताल बेताल झाला होता. ट्रेनचा हॉर्न कर्कशपणे कानठळय़ा बसवीत होता. सात-आठ जणांचा घोळका या मुलांना शोधीत आलाच. प्रथमत: सगळेच शांत होतं. मुलांचं कोर्ट मॅरेज झालेलं आहे हे त्यांना कळलं होतं. खरं तर आश्चर्याचा गोड धक्का मला बसला होता. कारण दोन्ही कुटुंबीयांनी हे लग्न स्वीकारलं होतं. ते मुलांची विनवणी करीत होते. या नवदांपत्यानं त्यांचं गाव सोडून कुठंही जाऊ नये हे पटवून देत होते. या सगळय़ाचं श्रेय त्या जोडप्याबरोबर असलेल्या काकांचं होतं. काकांनीच त्या मुलांच्या पालकांना हे लग्न झाल्याची आणि मुलं पळून जात असल्याची बातमी दिली होती. भविष्यातील विदारक परिणाम त्यांनी पालकांच्या दृष्टिपथात आणून दिले होते. वेळीच रागावर ताबा मिळवावा आणि जीवनातला आनंद मिळवावा हे पटवलं होतं. जीवन एकदाच मिळतं, ते सर्वांनी स्वत:च्या मर्जीनुसार आनंदाने जगावं ही विनवणी त्यांनी केली होती.

कुठलंसं स्टेशन आलं होतं. त्यांच्यासोबत ट्रेनच्या दारापर्यंत जाऊन मीही अनपेक्षित निघालेली लग्नाची वरात डोळे भरून पाहत होते. पुन्हा मी माझ्या सीटवर येऊन बसले. पुन्हा एकदा गाडीने सुमधूर झुकझुकचा ताल धरला होत. माझं स्टेशन जवळ येत होतं. तब्बल पाच वर्षांनी मी माझा रुसवा सोडून घरी नांदायला निघाले होते… घरी माझं स्वागत कसं होईल, काहीच कल्पना नाही.

अचानक आई आठवली. तिच्या रागानं तिचं घर सोडून निघाले होते. ती मला खूप उपदेशाचे डोस पाजत होती. ती माझ्या डोक्यात गेली. खरं तर तिची काहीच चूक नव्हती. स्वत:च्या लेकीला आई उपदेश नाही करणार तर कोण करणार? खरं तर मला राग यायचं कारणच नव्हतं. पण आता तिच्यापासून खूप दूर गेल्यावर मला शहाणपण सुचतंय. असो.

मला अचानक त्या मुलांना सोबत करणारे काका आठवले. त्यांचा ‘उपदेश’ही आठवला. ”वेळीच रागावर ताबा मिळवावा. मग जीवनात आनंदी आनंद असेल.” मी आईला फोन केला. मी माझ्या हक्काच्या घरी जात असल्याचं तिला सांगितलं. तिची माफी मागितली.” खरंच, डोक्यावरचा भार उतरल्यागत झालं. मला खूप शांत वाटलं. आता मी माझ्या नवऱ्याला फोन करीत होते. त्याच्या मोबाईलवर माझे पंचवीस तीस मिसकॉल पडले असतील. काही केल्या त्याने फोन उचलला नाही की कॉलबॅक केला नाही. ‘मी घरी नांदायला येत असल्याचा मेसेज केला. मेसेजचाही रिप्लाय आला नाही. मी चिंतातुर झाले. खरं तर स्टेशन जवळ येत होतं. पण ते स्टेशन माझ्या आयुष्यातला ‘थांबा’ असणार की नाही, ठरवता येत नव्हतं. गालांवरून अश्रुधारा ओघळत होत्या. सगळेच मार्ग अचानक बंद झाल्यासारखे वाटत होते. अगदी परतीचाही मार्ग उरला नव्हता…

एक माणूस स्टेशनवरून, डब्याडब्यांमधून फिरत होता. अखेरीस धापा टाकीत माझ्यासमोर येऊन ठाकला. होय! माझाच नवरा होता तो. त्याला पाहताच मला फार आनंद झाला. त्याच्या डोळय़ांत मला प्रेम, माझी प्रतीक्षा दिसत होती. तो म्हणाला, ”मी फोन उचलला नाही की तुझ्या मेसेजला उत्तर दिले नाही. पुन्हा शब्दाला शब्द नको वादाला वाद नको, तू माहेरहून निघालीस तेव्हाच तुझ्या आईनं मला फोन केला होता आणि तू खूप रागात असल्याचं सांगितलं होतं”. हलकंसं स्मित माझ्या चेहऱ्यावर उमलून राहिलेलं. मी म्हणाले, ‘माझा राग कायमचा मावळला. आता मला कोणाचाही राग कधीही येणार नाही. त्यानं गोड हसून माझी बॅग उचलली. माझा हात धरला आणि आम्ही दोघंही अलगद स्टेशनवर उतरलो. गाडी पुन्हा शिटी वाजवीत झुकझुकच्या तालावर सर्वच यात्रींचं जीवन सुरक्षित रुळांवरून आनंदयात्री बनवीत जोमानं पुढं निघाली होती…

आपली प्रतिक्रिया द्या