अमेरिकेचा जबरदस्त स्ट्राईक; पाकिस्तानवर ड्रोन हल्ला!

41

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

दहशतवाद्यांचे नंदनवन बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेने जोरदार तडाखा दिला. अमेरिकेने ड्रोन हल्ला करीत पाकमधील वायव्य प्रांतातील हक्कानी नेटवर्कचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या एहसान खावेरीसह किमान तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.

अफगाणिस्तानात सीमेलगतच्या पाकिस्तानच्या उत्तर वजिरीस्तान येथील आदिवासीबहुल लिंगू जिल्ह्याजवळ अमेरिकेने ड्रोन स्ट्राईक केले. ड्रोनद्वारे दोन क्षेपणास्त्रांचा मारा करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानातील हक्कानी नेटवर्क, तालिबान या दहशतवादी संघटनांचे अड्डे या प्रांतात आहेत. अमेरिकेच्या कारवाईमुळे पाकड्यांना हादरा बसला आहे. ‘हक्कानी’चा कमांडर एहसान खावेरीसह किमान तीन दहशतवादी ठार झाले.

अमेरिका आणखी हल्ले करणार
पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई न केल्यास अमेरिका आणखी हल्ले करू शकते, असे तज्ञांचे मत आहे. अमेरिकेने पाकमध्ये घुसून ओसामा बिन लादेनला कंठस्नान घातले होते. तशीच कारवाई पुन्हा अमेरिका करू शकते.

अमेरिकेने २०१८ मध्ये केलेला हा दुसरा ड्रोन हल्ला आहे. १७ जानेवारीला अफगाण सीमेजवळ पाकिस्तानात बादशहा कोट येथे ड्रोन डागले होते.

अमेरिकेने यापूर्वीही ड्रोन हल्ले करून पाकड्यांना धडा शिकविला आहे. २०१६ मध्ये ड्रोन हल्ल्यात तालिबानचा म्होरक्या मुल्ला अख्तर मन्सूर याचा खात्मा झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या