‘इंडिगो’कडून छळ! कर्मचाऱ्याची आत्महत्या, कुटुंबीयांचा आरोप; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

इंडिगो व्यवस्थापनाच्या छळाला कंटाळून विजय वाघचौरे या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. विजय यांना नाहक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर करावी, अशी मागणी विजय वाघचौरे यांची पत्नी स्मिता वाघचौरे यांनी केली आहे.

गेली 11 वर्षे इंडिगो कंपनीमध्ये ड्रायव्हर या पदावर कार्यरत असलेल्या विजय वाघचौरे यांनी 19 मे रोजी आत्महत्या केली. विजय यांच्या आत्महत्येला व्हीपी शनॅल डिसोझा, सहाय्यक व्यवस्थापक अंशुल माहोद, एक्झिक्युटीव्ह विल्सन देवेंद्र आणि पुश बॅक ऑपरेटर योगेश पुजारी हे जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्मिता वाघचौरे यांनी केली असून विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

विजय यांना जानेवारी 2023 मध्ये अर्धांगवायूचा झटका आला. बरे झाल्यानंतर ते कामावर रुजू झाले. मात्र, त्यांची वैद्यकीय स्थिती माहिती असूनसुद्धा अधिकाऱयांनी त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. जाणीवपूर्वक त्यांची बदली टी 1 येथून टी 2 येथे केली. या ठिकाणी कामावर पोहोचणे कठीण होते ही बाब विजय यांनी अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिली. तरीही त्यांची बदली मूळ ठिकाणी केली नाही. या छळाला पंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असे स्मिता यांनी नमूद केले.

विजय हे घरात एकटेच कमावते होते. त्यांच्या जाण्यामुळे आमच्या कुटुंबाचा आधारवड हरपला आहे. उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न आमच्यापुढे उपस्थित झाला आहे. इंडिगो पंपनीने माझी आणि माझ्या दीड वर्षाच्या बाळाची जबाबदारी घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी स्मिता यांनी केली आहे.

कुटुंबाला भरपाई आणि पत्नीला नोकरी देणार
इंडिगो व्यवस्थपानाच्या छळाला कंटाळून विजय वाघचौरे या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून भारतीय कामगार सेनेने याबाबत व्यवस्थापनाला धारेवर धरले. त्यामुळे नरमाईची भूमिका घेत वाघचौरे यांच्या कुटुंबाला पूर्ण भरपाई देण्याचे व त्यांच्या पत्नीला तिच्या शिक्षणानुसार नोकरी देण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले.