कश्मीरमधील किश्तवाडमध्ये दहशतवादी म्होरक्या रियाज अहमदला अटक

24

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांची संघटना मजबूत करण्याच्या प्रयत्नांना पोलिसांनी मोठा हादरा दिला आहे. किश्तवाडमध्ये पोलिसांनी हिजबुल मुजाहिद्दीनचा खतरनाक दहशतवादी म्होरक्या रियाज अहमदला अटक केली आहे. दहशतवाद्यांविरोधात पोलिसांना मिळालेले हे मोठे यश आहे. कश्मीर खोऱ्यातील युवकांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील करण्याचे काम रियाज करत होता. त्यांचे ब्रेनवॉश करून घातपाती कारवाया करण्यासाठी तो चिथावणी देत होता. खोऱ्यातील तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी करून संघटना मजबूत करण्याचा त्याचा इरादा होता. तालिबानचा म्होरक्या ओसामा बिन लादेन आणि रियाजमध्ये साम्य असल्याने कश्मीर खोऱ्यातील लादेन अशी त्याची ओळख होती. त्याला अटक करून पोलिसांनी दहशतवादाचे कंबरडे मोडले आहे.

कश्मीर खोऱ्यातील युवकांना चिथावणी देऊन त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील करून घेण्याचे प्रयत्न दहशतवाद्यांकडून होत आहेत. तरुणांना दहशतवादाच्या मार्गाकडे जाण्यापासून रोखण्यासाठी सरकार मोहीम चालवत आहे. मात्र, तरीही खोऱ्यातील अनेक तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील होत आहेत. ही चिंतेची बाब आहे. अनेक कुंटुबीय तरुणांना दहशतवादाचा मार्ग सोडण्याचे आवाहन करत आहे. दहशतवादी संघटनांमध्ये समील झालेल्या तरुणांना तो मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यायचे असल्यास त्यांना क्षमा दान देण्याची तयारी राज्य सरकारने दाखवली आहे. दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाल्यानंतर आपली चूक उमगल्यावर परत यायची तयारी असेल आणि घातापाती कारवायांमध्ये सहभाग नसेल अशा युवकांना राज्य सरकार संरक्षण देण्यासाठीही तयार आहे. युवकांमधील नाराजी दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

आकडेवारीनुसार 2010 नंतर या वर्षात सर्वाधीक 130 स्थानीक तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले आहेत. त्यातील अनेक तरुण अल कायदाकडे आकर्षित झाले आहेत. 31 जुलैपर्यंत 131 युवक विविध दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले आहेत. शोपिया जिल्ह्यातील सर्वात जास्त 35 तरुण दहशतवादाकडे ओढले गेले आहेत. रियाज अहमदला अटक झाल्याने तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी करण्याच्या दहशतवाद्यांच्या मनसुब्यांना हादरा बसला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या