हार्दिक, राहुल निलंबित; ‘कॉफी विथ करण’ या शोमधील वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद

94

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकेश राहुल व हार्दिक पांड़य़ा या हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा चांगलाच फटका बसला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत त्यांना निलंबित करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने घेतला आहे. बीसीसीआयच्या या कारवाईमुळे शनिवारपासून सुरू होणाऱ्या हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया यांच्यामधील वन डे मालिकेला दोघेही मुकणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

… म्हणून त्या एपिसोडला रेड सिग्नल
‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये आलेल्या पाहुण्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली गेली. त्यामुळे आमचा शो पाहणाऱ्या असंख्य जनतेच्या भावना दुखावल्या गेल्यात. याबाबत दिलगिरी व्यक्त करीत असून हॉटस्टारमधून तो एपिसोडही काढून टाकण्यात आला आहे, अशा प्रकारचे ट्विट हॉटस्टारकडून करण्यात आले आहे.

आक्षेपार्ह विधानांचे समर्थन नाहीच – विराट कोहली
हिंदुस्थानी संघाच्या दृष्टिकोनातून एखाद्या प्रसंगात कोणत्याही खेळाडूने केलेल्या आक्षेपार्ह विधानाला आमचा पाठिंबा नाहीए. त्यामुळे दोन्ही खेळाडूंनी केलेल्या विधानाशी संघ आमचा काहीही संबंध नाहीये. हे त्या दोन्ही खेळाडूंचे वैयक्तिक मत आहे. मला वाटतं दोन्ही खेळाडूंना आपल्याकडून काय चूक झालीये हे समजले आहे आणि या प्रकरणाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आलेले आहे, असे स्पष्ट मत हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने यावेळी व्यक्त केले.

शोच्या प्रवाहात वाहून गेलो – हार्दिक
‘कॉफी विथ करण’ या शोच्या प्रवाहात वाहत गेलो. बोलताना शब्दांचे भानच राहिले नाही. पण कोणाला दुखावण्याचा किंवा कमी लेखण्याचा हेतू यामागे नव्हता. कोणा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफी मागतो, असे हार्दिक पांडय़ा यावेळी म्हणाला.

‘आज मी करून आलो’, यामुळे गोत्यात
हार्दिक पांडय़ाने करण जोहरच्या ‘शो’मध्ये महिलांसोबत केलेल्या सेक्सबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. एका प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, माझ्या सेक्सलाइफबद्दल माझे कुटुंब खुलेपणाने चर्चा करतात. एकदा पार्टीला गेलो असताना तिथे उपस्थित असलेल्या कोणत्या मुलीसोबत संबंध ठेवले असे पालकांकडून विचारण्यात आल्यावर मी मुलीकडे बोट दाखवत त्यांना उत्तर दिले. पार्टी संपल्यानंतर ‘आज मी करून आलो’ असे पालकांना सांगितले. महिलांच्या वर्णभेदावरूनही त्याने आक्षेपार्ह विधान केले. महिलांबाबत असे विचार असलेला खेळाडू राष्ट्रीय संघात आहे ही बाब खरोखरच दुःखद बाब आहे, अशा शब्दांत क्रिकेटप्रेमींनी त्याला खडेबोल सुनावले.

आपली प्रतिक्रिया द्या