…तर हार्दिक टी-20 अन् वन डेत फिट नाही, माजी क्रिकेटपटू सरणदीप सिंग यांचे स्पष्ट मत

हार्दिक पांडय़ा टी-20 व वन डे क्रिकेटमध्ये जर गोलंदाजी करीत नसेल तर तो या संघांमध्ये फिट बसत नाही. सध्याच्या राष्ट्रीय निवड समितीने हिंदुस्थानच्या आगामी इंग्लंड दौऱयातील कसोटी मालिकेत त्याची निवड केलेली नाही. त्यांचा हा निर्णय योग्यच आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे माजी क्रिकेटपटू व माजी निवड समिती सदस्य सरणदीप सिंग यांनी.

सरणदीप सिंग पुढे म्हणाले, 2019 सालामध्ये हार्दिक पांडय़ाला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्याने टीम इंडियात पुनरागमन केले आहे, पण तो सातत्याने गोलंदाजी करीत नाही. त्यामुळे आगामी कसोटी मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याने वन डे मालिकेत दहा तर टी-20 मालिकेत चार षटकेच गोलंदाजी केलेली आहे. हार्दिक पांडय़ाला फक्त फलंदाज म्हणून संघात येणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

अष्टपैलू खेळाडूंची कमी नाही

हार्दिक पांडय़ाने गोलंदाजी केली नाही तर संघाचा बॅलन्स बिघडून जातो. त्यामुळे संघामध्ये पाच गोलंदाजांना संधी द्यावी लागते. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादवसारख्या अक्वल दर्जाच्या फलंदाजाला बाहेर बसवावे लागते. गेल्या काही सामन्यांमध्ये हे प्रकर्षाने दिसून आले.

शिवाय सध्या टीम इंडियामध्ये शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल व रवींद्र जाडेजा यांसारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. हे खेळाडू फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही विभागांत आपली कामगिरी चोख बजावू शकतात, असेही स्पष्टीकरण पुढे सरणदीप सिंग यांनी दिले.

पृथ्वी शॉचे कौतुक

सरणदीप सिंग यांनी मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉच्या फलंदाजीचे कौतुक केले. यावेळी ते म्हणाले, पृथ्वी शॉ हा हिंदुस्थानचा अक्वल दर्जाचा युवा फलंदाज आहे. वीरेंद्र सेहवागने जे देशासाठी केले ते पृथ्वी शॉ करू शकतो. ऑस्ट्रेलियन दौऱयातील अपयशानंतर त्याच्या फलंदाजी तंत्रात सुधारणा झाली आहे. स्थानिक मोसम व आयपीएलमध्ये त्याने धावांचा पाऊस पाडलाय. त्यामुळे त्याला डावलणे योग्य ठरणार नाही, असे सरणदीप सिंग यांना वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या