हार्दिक प्रफुल्ल पटेलांना भेटले

13

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

काँगेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे गुजरात दौऱयावर असतानाच पटेल समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी आज राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत बैठक घेऊन खलबते केली. दोन पटेलांची झालेली ही भेट म्हणजे काँगेसवर दबाव आणण्याची हार्दिक पटेल यांची खेळी असल्याचे मानले जाते.

‘प्रफुल्ल पटेल यांनी मला भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आमची भेट आनंददायक होती’, एवढाच खुलासा हार्दिक पटेल यांनी त्या भेटीवर ट्विटरवरून केला. बैठकीतील चर्चेचा तपशील देण्याचे मात्र त्यांनी टाळले.
काँगेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल हे विजयी झालेल्या गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीपासून काँगेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील संबंधांमध्ये काहीशी कटुता निर्माण झाली आहे. त्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी भाजप उमेदवाराला मतदान केले होते. त्यानंतरही गुजरातमधील काही काँगेस नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जुळवून घेण्याचे संकेत अलीकडेच दिले आहेत. मात्र युतीबाबत अद्यापि काही ठरलेले नाही.
हार्दिक पटेल यांनी पटेल समाजाला आरक्षण कसे देणार, हे ३ नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट करा, असे आवाहन काँगेसला शनिवारीच केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या