बंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप

उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात बंदुकीसोबत फोटो काढताना गोळी लागून महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दाबला गेल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे सासरच्या लोकांनी सांगितले. तर हुंड्यासाठी आपल्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

शहाबादमध्ये पतीपत्नी बंदुकीसोबत सेल्पी घेत होते, त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती पोलीस अधीक्षक कपीलदेव सिंह यांनी दिली. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुलीच्या कुटुंबियांनी केली होती. मात्र, सध्या संशयास्पद मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून या घटनेतील सर्व पैलूंचा विचार करत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेबाबत सासरच्या लोकांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. बंदुक जप्त करण्यात आली असून फॉरेन्सिक पथक अधिक तपास करत आहे.

या प्रकरणी महिलेच्या सासरच्या आणि माहेरच्या लोकांनी आपापले जबाब दिले असून सर्व बाजूंचा विचार करून तपास करण्यात येत आहे. महिलेचे बंदुकीसोबतचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अचानक चुकीने ट्रिगर दाबला गेल्याने गोळी सुटून महिलेचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मृत महिलेचे नाव राधिका असून तिचा पती आकाश, सासरे राजेश, सासू पूनम आणि दीर उमंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आकाश आणि राधिका यांचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. फोटो काढण्यासाठी वापरण्यात आलेली बंदूक महिलेचे सासरे राजेश यांची आहे. ती बंदूक पंचायतीच्या निवडणुकीदरम्यान प्रशासनाने ती ताब्यात घेतली होती. ती राजेश यांनी परत आणली होती. बंदूक परत आणल्यावर बंदुकीसोबत फोटो काढायचे राधिका आणि आकाश यांनी ठरवले. त्यावेळी ही घटना घडली. बंदूक परत आणल्यानंतर एका तासाच ही धक्कादयक घटना घडली आहे.

अनावधानाने ट्रिगर दाबला गेल्याने गोळी सुटल्याने राधिका गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने शहाबाद येथील रुग्णालयात नेण्यात आलेय तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. तिच्या गळ्याला गोळी लागून ती आरपार गेली होती. गोळी वर्मी लागल्याने तिची मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी बंदूक आणि राधिकाचा मोबाईल जप्त केला आहे. फॉरेन्सिक पथकही तपास करत आहे. त्याचा अहवाल आल्यावर अनेक गोष्ट स्पष्ट होतील, असे पोलिसांनी सांगितले.लग्नानंतर सासरचे दोन लाखांचा हुंडा मागत होते. त्यामुळे ही हत्या असल्याचा आरोप राधिकाच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. या प्रकरणाची तपास करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या