अद्भुत शक्तीचे महात्मा!

देशातील हिंदूंच्या हृदयामध्ये घर करून असणारे बाळासाहेब ठाकरे म्हणजे अद्भुत शक्ती असलेले महात्मा होते. शिवसेनेची आतापर्यंतची घोडदौड, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि मुंबई महानगरपालिकेवर सतत लहरत आलेला भगवा झेंडा हा बाळासाहेबांच्याच करिष्म्याचा एक भाग आहे. येणाऱ्या पिढीने त्यांचा हा प्रवास अभ्यासावा व त्यांचा आदर्श घ्यावा. योगायोगाने मलासुद्धा बाळासाहेबांचे दर्शन घेण्याची संधी संत रामरावजी महाराज यांच्यामुळे मिळाली.

संत रामरावजी महाराज हे एकदा मुंबईला आले असता, बाळासाहेबांना भेटण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. मी तेव्हा खासदार होतो. मी संत बापू व बापूंचे परमभक्त माणिक राठोड यांच्यासह ‘मातोश्री’वर पोहोचलो. बाळासाहेबांनी महाराजांना विचारले, ‘‘बोला महाराज, कसे काय येणे केले.’’ त्यावर संत रामराव महाराज म्हणाले की, ‘‘तांडा पाडय़ात, दऱ्याखोऱ्यात राहणारा हा आमचा बंजारा समाज मुख्य प्रवाहात आलेला नाही. तो अजूनही विकासापासून दूर आहे. तेव्हा आपण कृपया त्यांना एस. टी. प्रवर्गाचे आरक्षण मिळवून द्यावे.’’ तेव्हा बाळासाहेब ताडकन म्हणाले, ‘‘मला जात-धर्मावर आधारित आरक्षण मुळीच मान्य नाही.’’ तेव्हा मी बोललो- ‘‘बाळासाहेब आम्हाला केंद्र सरकारने आरक्षण दिलेले आहे, परंतु ओबीसीमध्ये घातले आहे. ओबीसी आम्हाला नको आहे. तर महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे भटक्या विमुक्तांना वेगळे आरक्षण दिले आहे त्याचप्रमाणे केंद्रातसुद्धा 27 टक्के आरक्षणाचे विभाजन करून आरक्षण द्यावे, ही आमची मागणी आहे.’’ दरम्यान ते माझ्या बंजारा क्रांती दलाच्या लेटरहेडवर असलेला सिम्बॉल न्याहाळत होते आणि म्हणाले, ‘‘छान, तुमचा हा सिम्बॉल अगदी हिंदूंच्या मनात जोश भरविणारा आहे. दोन तलवारी, ढाल आणि मध्ये त्रिशूल…!’’

असाच एक किस्सा माझ्या परिवारातील अत्यंत जवळचे नातेवाईक हिंदुभूषण श्यामजी राठोड महाराज यांच्याबाबतीत घडला. श्यामजी महाराज यांनी बाल कीर्तनकाराच्या रूपामध्ये ख्याती प्राप्त केली असून ते युवा वर्गामध्ये जागृती, हिंदू धर्म आणि राष्ट्रकार्य यांचे धडे आपल्या कीर्तनामधून देतात. त्यांना ‘‘हिंदुभूषण युवा कीर्तनकार’ हा पुरस्कार बाळासाहेबांच्या हस्ते देण्यात आला आहे. देशातील अनेक हिंदूंच्या हृदयामध्ये बाळासाहेबांचे नाव कोरले गेले आहे, हे मी नेहमी लोकांना सांगत असतो. मी महाराष्ट्राचा आहे असे जर मी बाहेरील राज्यांतील लोकांना सांगितले तर पुढची व्यक्ती लगेच उच्चारते- ‘‘हा, बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र. बाळासाहेबांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.’’ अशा वेळेस मनात येते की, बाळासाहेब हे खरोखरच अद्भुत शक्तीचे एक महात्माच आहेत आणि खरे हिंदुहृदयसम्राटदेखील!

  • हरिभाऊ राठोड (माजी खासदार)
आपली प्रतिक्रिया द्या