बोरिवलीच्या भगवती रुग्णालयाचा कायापालट होणार

307

बोरिवलीमधील भगवती रुग्णालय पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात 490 खाटांची व्यवस्था होणार असून अत्याधुनिक आणि अतिविशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. रुग्णालयाच्या अत्याधुनिकीकरणामुळे पश्चिम उपनगरासह पालघरपर्यंतच्या नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार असून केईएम, नायर, शीव या रुग्णालयांवरील ताण कमी होणार आहे.

या कार्यक्रमाला स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरी, आमदार विलास पोतनीस, उपमहापौर हेमांगी वरळीकर, विधी समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे, प्रभाग समिती अध्यक्ष संध्या दोशी, नगरसेवक हरीश छेडा, नगरसेवक संजय घाडी, जगदीश ओझा, विद्यार्थी सिंग, जीतेंद्र पटेल, प्रवीण शहा, हर्षद वारकर, नगरसेविका रिद्धी खुरसुंगे, तेजस्वी घोसाळकर, गीता सिंघण, सुजाता पाटेकर, आसावरी पाटील, बिना दोशी, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर उपस्थित होते.

आयसीयू, डायलिसीस सेंटर सुरू करणार
भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात बांधण्यात आलेल्या नर्सिंग ट्रेनिंग सेंटरच्या इमारतीमध्ये रुग्णसेवेकरिता 110 रुग्णशय्येचा वैद्यकीय विभाग जुलै 2016 पासून सुरू करण्यात आला आहे. आता पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात 490 रुग्णशय्येचे अत्याधुनिक उच्चस्तरीय रुग्णालय अतिविशेष सेवांसह सुरू करण्यात येणार आहे. हे रुग्णालय तातडीने कसे सुरू करता येईल, तसेच या ठिकाणी आयसीयू, डायलिसीस सेंटर लवकर सुरू करावे अशी सूचनाही महापौरांनी यावेळी केली.

आपली प्रतिक्रिया द्या