हिंदुस्थानला धक्का, हरमनप्रीत कौरच्या खांद्याला दुखापत

34

सामना ऑनलाईन । लंडन

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी हिंदुस्थानी संघाला मोठा धक्का बसला आहे. हिंदुस्थानची धडाकेबाज खेळाडू हरमनप्रीत कौरला दुखापत झाली आहे. त्यामुळे रविवारी लॉर्डसवर खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात हरमनप्रीतच्या खेळण्यावर संशय निर्माण झाला आहे. शनिवारी सरावादरम्यान हरमनप्रीत कौरच्या खांद्याला दुखापत झाली आहे.

नेटमध्ये फंलदाजी करताना तिच्या खांद्याला दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर तिने फलंदाजीचा सरावही केला नाही. तसेच संपूर्ण वेळ ती बर्फाच्या लादीने खांद्याला शेक देत असल्याचे दिसून आली. त्यामुळे रविवारी होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात ती खेळणार की नाही याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र खबरदारी म्हणून हरमनप्रीतला दुखापतीनंतर नेटट्समध्ये सरावाला पाठवण्यात आले नाही अशी माहिती मिळत आहे.

कर्णधार मिताली राजने रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी हरमनप्रीतची दुखापत बरी होईल आणि ती तिच्या नेहमीच्या अंदाजात फलंदाजी करताना दिसेल असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाविरूद्ध ११५ चेंडूत धडाकेबाज १७१ धावांची नाबाद खेळी करणारी हरमनप्रीत अंतिम सामन्यात खेळू शकली नाही तर हा हिंदुस्थानला मोठा धक्का असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या