खराखुरा ‘चक दे इंडीया’, हॉकी प्रशिक्षकाची थक्क करणारी कहाणी

5

सामना ऑनलाईन। मुंबई

हिंदुस्थानी ज्युनिअर हॉकी संघाने विश्वचषक उचलला तेव्हा सगळे कॅमेरे या तरूण तडफदार हॉकीपटूंकडे वळलेले होते. मात्र दुसरीकडे या संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग हे अक्षरश: रडत होते, अर्थात ते आनंदाश्रू होते, मात्र या अश्रूंमागची कहाणी ही चक दे इंडिया चित्रपटासारखीच आहे, किंबहुना त्यापेक्षाही अधिक थक्क करणारी आणि प्रेरणा देणारी आहे.

new-team-2
निवड समितीने हरेंद्र सिंग यांना राष्ट्रीय हॉकी संघातून एकमताने काढून टाकलं होतं. त्यानंतर त्यांनी प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. ही गोष्टी आहे १९९८ सालची, मात्र ही नवी भुमिका स्वीकारत असताना त्यांनी एक निश्चय केला होता, की भले मी ऑलिम्पिक पदक विजेत्या किंवा विश्वविजेत्या संघाचा हिस्सा नसेन मात्र मी देशाला असे खेळाडू घडवून देईन जे ऑलिम्पिक पदकही मिळवतील आणि विश्वचषकही. जेव्हा लखनऊ इथे बेल्जियमला हरवून हिंदुस्थानी संघाने तिरंगा पडकावला तेव्हा या सगळ्या गोष्टी हरेंद्र सिंग यांना आठवल्या आणि नकळत त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला सुरूवात झाली. हरेंद्र यांनी मनात केलेला निश्चय हिंदुस्थानी ज्युनिअर हॉकी संघाने पूर्ण केला होता.

new-team
हॉकीचा फारसा अनुभव नसलेल्या युवकांना एकत्र आणून त्यांना शिस्त लावत, संघ भावना निर्माण करत विश्वविजेता संघ घडवणं हे अत्यंत कठीण काम होतं. हॉकीपटूंनी देखील यासाठी प्रचंड मोठी मेहनतही केली आणि त्यागही केला. संघातील दुसरा गोलरक्षक कृष्णन पाठक याला त्याच्या वडीलांच्या अत्यंतसंस्कारालाही जाता आलं नाही कारण तेव्हा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. या युवा संघाने १५ वर्षांचा विश्वचषकाचा दुष्काळ तर संपवलाच शिवाय हॉकीच्या उज्ज्वल भविष्याचीही पुन्हा स्वप्न दाखवायला सुरूवात केलीय.