मंत्रालयात आत्महत्या करणारा हर्षल रावते कोण आहे?

88

सामना प्रतिनिधी । पैठण

मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन ऊडी मारुन आत्महत्या केलेला हर्षल रावते हा पैठणच्या कारागृहातील कैदी होता. मेहुणीचा खूनप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. राज्यातील बंदिस्त कारागृहांमध्ये १० वर्ष सजा भोगल्यावर चांगल्या वर्तवणुकीमुळे त्याला ३ वर्षांपूर्वी पैठणच्या खुल्या कारागृहात पाठवण्यात आले होते. जन्मठेपेचे काही महिनेच शिल्लक असताना त्याचा दुर्दैवी अंत झाला. विशेष म्हणजे त्याचा पँरोलचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे आजच तो कारागृहात हजर राहणे अपेक्षित होते.

पैठणच्या खुल्या कारागृहाचे अधिक्षक सचिन साळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल रावते हा ४४ वर्षीय कैदी २०१४ साली पैठणच्या कारागृहात दाखल झाला. यापूर्वी त्याने राज्यातील विविध बंदिस्त कारागृहांमध्ये जवळपास १० वर्षांची शिक्षा पुर्ण केली होती. तथापि या संपूर्ण कालावधीत त्याची वागणूक चांगली असल्याने त्याची रवानगी खुल्या कारागृहात करण्यात आली होती. पैठणच्या खुल्या कारागृहात हातमागावर कापड तयार करणे, कृषीकामासाठीचे पशुधन सांभाळून त्यांची निगा राखणे, तसेच सुतारकाम, लोहारकाम, व अन्य कौशल्य पुर्ण कामे कैद्यांकडून करून घेतली जातात. बागकामासह कारागृहातील शेकडो एकर शेतजमिनीवर बंदिजनांना शेतीकामही दिले जाते. हर्षल रावते यालासुध्दा शेतीकामाची आवड असल्याने त्याला शेतातच काम देण्यात आले होते. शेतीकामासह हर्षल रावते याला संगणकीय ज्ञान ऊत्तम असल्याने त्याला कारागृहातील कैद्यांना संगणक शिकवण्याचेही काम देण्यात आले होते. हे काम तो आवडीने करत असे. विशेष म्हणजे अत्यंत चांगली वर्तणूक असलेल्या हर्षलची कोणत्याही प्रकारची तक्रार नव्हती, असेही साळवे यांनी स्पष्ट केले.

चेंबुर (मुंबई) भागातील रहिवाशी असलेल्या हर्षल रावते याने १३ वर्षांपुर्वी पैश्याच्या वादातून स्वतः च्या मेहुणीचा खुन केला होता. या प्रकरणात त्याला जन्मठेप झाली. खासगी कारणांमुळे त्याने १० जानेवारी ते ८ फेब्रुवारी अशी पँरोलची रजा घेतली होती. सुटीचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे गुरुवारी तो हजर होणे अपेक्षित होते. त्याची सुटका होण्यासही काही महिनेच शिल्लक असताना त्याने जगाचाच निरोप घेतला आहे. पॅरोलची त्याची ही तिसरी सुट्टी अखेरची सुट्टी ठरली.

आपली प्रतिक्रिया द्या