हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस भवनची जागा परत द्यावी

हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमध्ये काँग्रेस भवनची इमारत व जागा ताब्यात ठेवली आहे. ती जोपर्यंत काँग्रेस पक्षाच्या ताब्यात देत नाहीत, तोपर्यंत त्यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्याबाबत विचार करू नये, याउलट ही बाब संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यात येईल, अशी भूमिका जिल्हा काँग्रेसने घेतली आहे.

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार संजय जगताप यांनी यासंदर्भात आज निवेदन जारी केले. काँग्रेस पक्षाने इंदापूर तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तींना आमदार, मंत्रीपदे दिलेली असूनही ज्यावेळी प्रतिष्ठित व्यक्तीने काँग्रेस पक्ष सोडला त्यावेळेस इंदापूर काँग्रेस भवन इमारतीचे आतून संपूर्ण मोडतोड करून इमारतीचे नुकसान करूनही इमारतीचा कब्जा सोडला नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे.

वास्तविक पाहता इंदापूर काँग्रेस भवनची इमारत व जागा सध्या इंदापूर काँग्रेस कमिटीच्या ताब्यात नसून, मालकीहक्क संबंधाच्या कागदपत्रामध्ये फेरफार केलेला त्यानुसार सदर कागदपत्रावर इंदापूर तालुका काँग्रेस चॅरिटेबल ट्रस्ट, इंदापूर असे लावण्यात आले असून, यासंदर्भात सिटी सर्व्हे, मिळकत पत्र व जागेचा नकाशा ही खोटी कागदपत्रे तयार करण्यात आलेली आहेत.

सध्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे काम करत आहे. सध्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका त्यामध्ये इंदापूर विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीतर्फे ही जागी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जर यांना देण्यात आली, तर या गटामध्ये प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस भवनची इमारत व जागा ताब्यात ठेवली आहे, ती जोपर्यंत काँग्रेस पक्षाच्या ताब्यात देत नाहीत तोपर्यंत त्यांना उमेदवारी देण्याबाबत विचार करू नये. अशी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भूमिका आहे. ही भूमिका महाविकास आघाडीमध्ये प्रभावीपणे मांडली जाणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी म्हटले आहे.