माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कन्या अंकिता पाटील व त्यांचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. इंदापूर शहरातील जुन्या बाजार समितीच्या मैदानावर जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार, पक्षाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रोहित पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी फुंकली.
पक्षप्रवेशावेळी कार्यकर्त्यांनी झळकावलेले पोस्टरही चर्चेचा विषय ठरले. ‘बाप तो बाप रहेगा’, ‘इंदापूरला मलिदा घेऊन काम वाटणारा आमदार नको’, ‘मलिदागँग हटवा हर्षवर्धनभाऊंना विधानसभेत पाठवा’, असे पोस्टर यावेळी मंचावरील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी झळकावले.
हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. कार्यकर्त्यांनीही रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, अशी मागणी केली. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेत हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला.
हा निर्णय घेण्यापूर्वी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याचे पाटील यांनी सांगितले. इंदापूरची जागा ही विद्यमान सदस्याला जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. दुसरा पर्याय काढू, असे फडणवीस म्हणाले. पण दुसरा पर्याय स्वीकारणे कार्यकर्त्यांना मान्य झाले नसते. व्यक्तिगत तो निर्णय योग्य ठरला असता, पण जनतेचा प्रश्न असतो, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.