‘या’ प्रसिद्ध निर्मात्याला बलात्काराच्या आरोपांतर्गंत अटक

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

हॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता हार्वी वाइन्स्टीनला बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आलीय. महिन्याभरापूर्वी ८० पेक्षा अधिक महिलांनी त्याच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत बंड केले होते. त्यानंतर संपूर्ण जगभरात ‘#Metoo’ चे कॅम्पेन सुरू झाले होते. अखेर वाइन्सटीनला एका महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी आणि इतर अनेक महिलांशी ओरल सेक्ससाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपांतर्गंत शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.

harvey-weinstein-01

अमेरिकेच्या चित्रपट सृष्टीतील एकेकाळचे प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या वाइन्स्टीनला शुक्रवारी मॅनहटच्या एका पोलीस स्थानकात दिसले. सरकारी अधिकाऱ्यांनी याप्रकरणी सांगितल्यानुसार, वाइन्स्टीनला बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान अभिनेत्री ग्यानेथ पाल्ट्रो, एंजलिना जोली, सलमा हायेक, एश्ले जूड, उमा थरमन आणि एशिया आर्गेन यांच्यासमेवेत ऐंशीहून अधिक महिलांनी वाइन्स्टीनवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते.

हार्वी वाइन्स्टीनने केलेल्या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी सुरू झालेल्या ‘#MeToo’ कॅम्पेनअंतर्गत अनेक महिलांनी आपल्यावर झालेल्या अत्याचारांबाबतच्या कटू आठवणी जगजाहीर केल्या होत्या. सेलेब्रेटींपासून सामान्य नागरिकांपर्यंत साऱ्याच जणींनी आपला अनुभव शेअर केला. काही दिवसांपूर्वी झालेल्या कान्स फेस्टिव्हलमध्ये इटलीच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने आसिया ऐर्जेंतोने हॉलिवूडचे निर्माते हार्वी वाइन्सटीन यांच्यावर बलात्काराचा आरोप करत कान्सला बलात्काराचा अड्डा असे संबोधले होते.