Assembly election – हरयाणामध्ये आप आणि काँग्रेसचे सूत जुळणार? केजरीवाल घेणार अंतिम निर्णय

हरयाणामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून 5 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. हमीभावासह इतर मागण्यांसाठी सुरू असलेले शेतकरी आंदोलन, लैंगिक शोषणाविरोधात महिला खेळाडूंनी केलेले आंदोलन आणि इतर मुद्द्यांमुळे हरयाणामध्ये गेल्या 10 वर्षापासून सत्तेत असलेल्या भाजपविरोधात वातावरण दिसतेय. याचाच फायदा उठवण्यासाठी आगामी निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये सूत जुळण्याची शक्यता आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी हे संकेत दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत राहुल गांधी यांनी आपला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. अर्थात काँग्रेसने अधिकृतपणे याबाबत भाष्य केलेले नाही. मात्र माध्यमांच्या सूत्रांनी आधारे याबाबत वृत्त दिले असून संजय सिंह यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय सिंह यांनी राहुल गांधी यांच्या ऑफरचे स्वागत केले आहे.

राहुल गांधी यांच्या विधानाचे मी मनापासून स्वागत करतो. भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यास आमचे प्राधान्य आहे. परंतु मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावर अंतिम निर्णय घेतील, असे संजय सिंह म्हणाले.

काँग्रेसच्या बैठकीत 34 नावांवर मोहर

हरयाणातील 90 जागांवर 5 ऑक्टोबरला मतदान होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या एकामागून एक बैठका सुरू आहेत. सोमवारीही काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये 34 उमेदवारांची नावं जवळपास निश्चित झाली आहेत. बुधवार पर्यंत अंतिम यादी येण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रभारी दीपक बाबरिया यांनी दिली.

काँग्रेसच्या बैठकीमध्ये 49 नावांवर चर्चा करण्यात आली. यापैकी 34 नावं पक्की झाली असून 15 नावं प्रलंबित आहेत. काँग्रेसने 22 विद्यमान आमदारांचे तिकीटही पक्के केले आहे.