हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 37 जागांवर समाधान मानावे लागले. त्यावर आता काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी हरयाणा निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित केले आहे. ते म्हणाले विधानसभा क्षेत्रातून अनेक तक्रारी आल्या आहेत. निवडणूक आयोगाला आता याची जाणीव करून देण्यात येणार असल्याचा संताप राहुल गांधी यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर व्यक्त केला आहे.
राहुल गांधी म्हणाले की, आम्ही हरयाणाच्या अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत. अनेक विधानसभा क्षेत्रांमधून तक्रारी येत असून निवडणूक आयोगाला त्याबाबत कळवणार आहोत. सर्व हरयाणातील नागरिकांनी दिलेला पाठिंबा आणि आमच्या धाडसी कार्यकर्त्यांना त्यांच्या अथक परिश्रमासाठी मनापासून धन्यवाद. हक्क, सामाजिक आणि आर्थिक न्यायाचा, सत्याचा हा संघर्ष सुरूच राहील. तुमचा आवाज बुलंद करत राहू, असा निर्धार राहुल गांधी यांनी यावेळी केला.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर लिहिले की, जम्मू कश्मीरच्या नागरिकांचे मनापासून धन्यवाद. प्रदेशात इंडिया आघाडीचा विजय हा संविधानाचा विजय आहे. लोकशाही स्वाभिमानाचा विजय आहे.
जम्मू-कश्मीर के लोगों का तहे दिल से शुक्रिया – प्रदेश में INDIA की जीत संविधान की जीत है, लोकतांत्रिक स्वाभिमान की जीत है।
हम हरियाणा के अप्रत्याशित नतीजे का विश्लेषण कर रहे हैं। अनेक विधानसभा क्षेत्रों से आ रही शिकायतों से चुनाव आयोग को अवगत कराएंगे।
सभी हरियाणा वासियों को…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 9, 2024
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही हरयाणा निवडणुकीच्या निकालावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी त्याला व्यवस्थेचा विजय असे सांगितले होते. माध्यमांशी बोलताना जयराम रमेश म्हणाले की, हरयाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही कारण हा लोकशाहीचा पराभव आहे आणि व्यवस्थेचा विजय आहे. तर पवन खेडा यांनी ईव्हिएमच्या बॅटरीपर्यंत प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, हिसार, महेंद्रगड आणि पानीपत जिल्ह्यांमधून सातत्याने तक्रारी येत आहेत की, तिथे ईव्हिएमची बॅटरी 99 टक्के होती. या जागेंवर काँग्रेसचा पराभव झाला. तर ज्या मशिनींसोबत छेडछाड केलेली नाही आणि ज्याची बॅटरी 60 ते 70 टक्के होती, तिथे आमचा विजय झाला आहे, या सर्व तक्रारी घेऊन आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत.