संत मीराबाईप्रमाणे कृष्णभक्तीत तल्लीन व्हायचंय, महिला ‘आयपीएस’ने मागितली स्वेच्छानिवृत्ती

भगवान श्रीकृष्णाची परमभक्त संत मीराबाई आपल्या सर्वांना माहिती आहे. 16 व्या शतकात जन्मलेल्या मीराबाईने श्रीकृष्णाला उद्देशून जवळपास 1300 ते 1400 रचना लिहिलेल्या आहेत. याच मीराबाईप्रमाणे आपल्यालाही कृष्णभक्तीत तल्लीन व्हायचं आहे, त्यामुळे स्वेच्छानिवृत्ती द्यावी, अशी मागणी महिला आयपीएस अधिकारी भारती अरोरा यांनी केली आहे.

‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, भारती अरोरा या 2031 मध्ये निवृत्त होणार आहेत. मात्र त्यांना 10 वर्ष आधीच स्वेच्छानिवृत्ती हवी असून यासाठी त्यांनी 24 जुलैला डीजीपी यांना पत्रही पाठवले. पोलिसात असताना देशसेवा करणे माझ्यासाठी गर्वाचा क्षण होता असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच पुढील आयुष्य चैतन्य महाप्रभू, कबीरदास आणि मीराबीई यांच्याप्रमाणे कृष्णभक्तीत आणि धार्मिक कार्यात व्यतित करण्याची आपली इच्छा असल्याचेही त्यांनी म्हटले.

तसेच तीन महिन्यांचा नोटिस पीरियडही आपण पूर्ण करू इच्छित नसल्याचे भारती अरोरा यांनी म्हटले आहे. दरम्यान, त्यांच्या मागणीवर अद्याप निर्णय झालेला नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या संपर्कात असून मन वळवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

‘समझोता एक्सप्रेस’ ब्लास्ट तपासात महत्वाची भूमिका

नवी दिल्लीहून अटारीला जाणाऱ्या समझोता एक्सप्रेसमध्ये 18 फेब्रुवारी, 2007 ला बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणी तपासामध्ये हरयाणा कॅडरच्या 50 वर्षीय आयपीएस अधिकारी भारती अरोरा यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी त्या हरयाणा रेल्वे पोलीसमध्ये एसपी पदावर कार्यरत होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या