दसऱ्याला 11 रेल्वे स्थानके आणि 6 राज्यातील मंदिरे उडवण्याची ‘जैश’ची धमकी

2616

दसऱ्याच्या दिवशी 8 ऑक्टोबरला 11 रेल्वे स्थानके आणि सहा राज्यातील मंदिरे बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने दिली आहे. धमकीचे हे पत्र रोहतक स्थानकाच्या अधीक्षक यशपाल मीणा यांना कराचीहून आले आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पाठवलेले हे पत्र शनिवारी दुपारी त्यांना मिळाले आहे. पत्रात पाठवणाऱ्याचे नाव मसूद अहमद असे आहे. जैश ए मोहम्मदचा जम्मू कश्मीरचा एरिया कमांडर असल्याचा दावा त्याने केला आहे. या पत्राची गंभीरतेने दखल घेऊन चौकशी करण्यात येत आहे. तसेच रेल्वे स्थानकांवरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

रोहतक जंक्शन, रेवाडी, हिसार, कुरुक्षेत्र, मुंबई, बंगळुरु, चेन्नई, जयपूर, भोपाळ, कोटा आणि इटारसी या रेल्वे स्थानकांसह राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाणातील मंदिरे बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी दिली आहे. या धमकीच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सर्तकतेच्या सूचना देण्यात आल्या असून बंदोबस्त आणि तपासणी वाढवण्यात आली आहे. ‘आम्ही आमच्या जिहादींच्या बलिदानाचा बदला घेणार आहोत. यावेळी आम्ही हिंदुस्थानला बॉम्बस्फोटांनी हादरवून टाकू. 8 ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी 11 रेल्वे स्थानके आणि सहा राज्यातील मंदिरे बॉम्बस्फोटाने उडवण्यात येतील. आमचे हजारो जिहादी हिंदुस्थान उद्ध्वस्त करण्यासाठी तयार आहेत. त्यादिवशी सर्वत्र रक्ताचे पाट वाहतील’, असे या पत्रात म्हटले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या