हरयाणात मनोहरलाल खट्टर यांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

756

हरयाणात मनोहरलाल खट्टर यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तसेच जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. हरयाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. हरयाणाची राजधानी असलेल्या चंदीगडमधील राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. खट्टर यांच्या शपथविधीच्या सोहळ्यात भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

हरयाणात कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे हरयाणात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली. शुक्रवारी रात्री भाजप आणि जेजेपीच्या युतीची घोषणा झाली. चौटाला यांच्या जेजेपीने हरयाणात 10 जागा जिंकल्या आहेत. भाजपा ४० जागांवर यश मिळाले आहे. बहुमतासाठी 46 जागांची गरज आहे. त्यामुळे जेजेपीकडे किंगमेकरची भुमिका आली होती. भाजपध्यक्ष अमित शहा, मनोहरलाल खट्टर आणि दुष्यंत सिंह चौटाला यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युती जाहीर केली. तसेच जेजेपीला उपमुख्यमंत्री दिले जाईल असेही या परिषदेत जाहीर करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या