सासरचे घर सोडलेल्या हरयाणाच्या महिला कबड्डीपटूला पोलिसांनी मुंबईत रोखले

1133

सासरच्या मंडळीकडून प्रोत्साहन मिळत नसल्याने हरयाणातील महिला कबड्डीपटूने घर सोडले. ती मुंबई सेंट्रल टर्मिनसला आली. गोंधळलेल्या स्थितीत तिला एमएसएफ महिला जवानांनी पाहिले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी समुपदेशन करून तिच्या मनातील गैरसमज दूर केला.

काजल ही मूळची हरयाणाची रहिवासी. ती राज्यपातळीवर कबड्डी खेळायची. देशासाठी खेळायचे अशी तिची इच्छा होती पण तिची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली नाही. त्याच दरम्यान तिच्या आईवडिलांनी तिचे लग्न लावले. लग्नानंतर सासरची मंडळी आपल्याला कबड्डी खेळण्यासाठी प्रोत्साहन देईल असे तिला वाटत होते मात्र सासरच्यांनी तिला कबड्डीसाठी मैदानात सोडले नाही. त्यामुळे तिने घर सोडून जाण्याचे मनाशी ठरवले. गेल्या आठवडय़ात ती घरातून निघाली. तिने दागिने आणि रोख असे 3 लाख 11 हजार रुपये सोबत आणले. दुसऱ्या दिवशी काजल मुंबईत आली. पुढे काय करायचे हा प्रश्न तिला सतत सतावत होता. मुंबईची गर्दी पाहून ती गोंधळली. ती मुंबई सेंट्रल टर्मिनसच्या प्रतीक्षागृहात बसून होती. काजल गोंधळलेल्या अवस्थेत एमएसएफच्या रजनी कदम आणि स्वप्नाली राव यांना दिसली. त्यांनी याची माहिती मुंबई सेंट्रल रेल्वेचे वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र धिवार यांना दिली. त्यानंतर महिला पोलीस शिपाई शिंदे, काजळे यांनी काजलला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली. पोलिसांनी तिचे समुपदेशन केले. काजल मुंबईत आल्याचे तिच्या नातेवाईकांना कळवण्यात आले. तिला तात्पुरत्या स्वरूपात ‘ऊर्जा’ या संस्थेत ठेवण्यात आले आहे.

अटेंडन्सने दिला मित्राचा नंबर

प्रवासादरम्यान एका अटेंडन्सला काजल गोंधळलेल्या स्थितीत दिसली. त्याने संधी साधून आपला मित्र स्पोर्ट अकादमीमध्ये आहे. तो तुला मदत करेल असे सांगून एकाचा नंबर काजलला दिला. काजलने त्या नंबरवर फोनही केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या