हरयाणा पोलिसच हनीला लपवताहेत ?

 सामना ऑनलाईन । चंदीगड
बलात्कार प्रकरणी तुरुंगात असलेल्या राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत हिला हरयाणा पोलिसच लपवत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. हनीला शोधण्यासाठी पोलीस नेपाळला गेले होते त्याचदरम्यान पोलिसांच्या नाकावर टिचून ती दिल्लीत आली. तिने वकिलाशी दोन तास चर्चा केली पण याची साधी भनकही पोलिसांना लागली नाही. कारण काही पोलिसच तिला पळून जाण्यास मदत करत आहेत, अशी माहिती एका हिंदी वृत्तवाहिनीने दिली आहे.
२५ ऑगस्टला हरयाणा पोलिसांनी राम रहीमच्या एका सुरक्षा कर्मचाऱ्याकडून एक वायरलेस जप्त केला होता. त्या वायरलेसवरुन तो पोलिसांच्या हालचालींबद्दल हनी व बाबाच्या गुंडाना माहिती देत होता, असा दावा या वृत्तवाहिनीने केला आहे. हरयाणा पोलिसातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कॉन्स्टेबलपर्यंत अनेकजण हनीला माहिती पुरवत आहेत. यामुळे प्रत्येकवेळी चकवा देण्यात हनी यशस्वी होत आहे. राम रहीमला अटक केल्यानंतर हनीनेच बाबाच्या समर्थक व गुंडाना हिंसाचार घडवण्याच्या सूचना दिल्या होत्या. याबद्दल हनीप्रीत व डेराचे प्रवक्ते डॉक्टर आदित्य इन्सावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. या दोघांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. पण पोलीस खात्यातीलच काहीजण हनी व आदित्यला पोलिसांच्या हालचालींबद्दल कळवत आहेत. यामुळेच पोलिसांनी राम रहीमला अटक केल्यानंतर हनीप्रीतला आरामात फरार होता आले आहे.
पंचकुलातून निघाल्यावर हनीप्रीत डेऱ्यात दोन दिवस मुक्कामी होती. दुसऱ्या दिवशी  सिरसामध्ये संचारबंदी लागू होती. पण त्यातूनही संपूर्ण कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ती पसार झाली. तिला अटक करण्याऐवजी पोलिसांनीच तिला सिरसाबाहेर पडण्यास मदत केल्याची चर्चा आहे. त्यानंतर २८-२९ ऑगस्टला ती राजस्थानमध्ये भावाच्या सासरी जाऊन राहिली होती. यावेळी तिच्याबरोबर पोलीस कमांडोज होते.  त्यांच्या मदतीनेच ती आपली राहण्याची ठिकाणं बदलत आहे, असेही या वृत्तवाहिनीने म्हटले आहे.