तरुणीची छेडछाड, भाजप नेत्याच्या मुलाला अटक

39

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मोदी सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत असल्याच्या बाता बेंबीच्या देठापासून ओरडत सांगत असले तरी त्यांच्या या प्रयत्नांना पक्षातील लोकांकडूनच हरताळ फासले जात आहे. हरियाणा भाजपचे अध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलाला तरुणीची छेडछाड केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. चंदीगड पोलिसांनी सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीची छेडछाड करणाऱ्या भाजप नेत्याचा मुलगा विकास बराला आणि त्याचा मित्र आशिष यांच्याविरोधात चंदीगडच्या सेक्टर-२६ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरोधात तरुणीची छेडछाड आणि दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली होती.

तरुणीने तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी तरुणांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. तसेच माझा पाठलाग केला आणि छेडछाड केली. आरोपींच्या गाडीचा नंबरही (१००८) तरुणीने सांगितला. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी दारू प्यायल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही आरोपींविरोधात भादंवि कलम ३५४ ड आणि १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या